Ashok Kharat Fraud Case Pudhari
रायगड

Ashok Kharat Fraud Case: भोंदू अशोक खरातच्या पत्नीच्या नावावर उरणमध्ये 58 लाखांची जमीन

अटकेच्या दिवशीच झाला नोंदणी करार; महसूल-निबंधक यंत्रणेचा कारभार उघड

पुढारी वृत्तसेवा

जेएनपीए: नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणातील मुख्य आरोपी अशोक खरातने चाणजे, ता.उरण येथे जमीन घेतल्याचे उघड झालेले आहे. जमीन व्यवहाराने केवळ महसूलच नव्हे, तर निबंधक यंत्रणेच्या पारदर्शकतेवरही मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कारण, ज्या दिवशी अशोक खरात अटकेत गेला, त्याच दिवशी त्याची फरार पत्नी कल्पना अशोक खरात हिच्या नावावर जमिनीच्या नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे.

12 मार्च रोजी अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांच्याकडून जमीन नोंदणीकृत खरेदीखताद्वारे कल्पना खरात यांच्या नावावर घेण्यात आली.

हा व्यवहार सुमारे 58 लाख 50 हजार रुपयांचा असल्याचे समजते. व्यवहारानंतर अवघ्या काही दिवसांतच, 17 मार्च 2026 रोजी तलाठी सजा चाणजे यांनी वर्दी नोटीस चावडीवर प्रसिद्ध केली आणि नेमक्या याच दिवशी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्याची नोंद आहे.

यानंतरही व्यवहाराचा वेग थांबला नाही. 13 एप्रिल 2026 रोजी फेरफार क्रमांक 8351 मंजूर करण्यात आला. म्हणजे, संपूर्ण व्यवहाराची महसूल नोंद प्रक्रिया अवघ्या एका महिन्याच्या आत पूर्ण करण्यात आली.

या संपूर्ण प्रकरणात दुय्यम निबंधक उरण, तहसीलदार उरण, मंडळ अधिकारी चाणजे आणि तलाठी चाणजे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. व्यवहार करताना आवश्यक ती पडताळणी झाली का? संबंधित व्यक्तीची स्थिती तपासली का? की कागद जाणूनबुजून पुढे ढकलले गेले? या सर्व बाबींची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

जमीन विक्रेते अस्मिता अविनाश म्हात्रे व कैलास मिश्रीमल शहा यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या व्यवहारात नियमांचे उल्लंघन झाले का? व्यवहारासाठी आवश्यक असलेली पडताळणी व कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने झाली का? या सर्व मुद्यांवर सखोल चौकशीची गरज व्यक्त होत आहे.

या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी, दुय्यम निबंधक व महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासून जबाबदारी निश्चित करावी, सदर जमीन व्यवहार कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, हा केवळ एक जमीन व्यवहार नाही हा प्रशासनाच्या पारदर्शकतेवर पडलेला गंभीर डाग असल्याचे बोलले जात आहे आणि हा डाग पुसला गेला नाही, तर भविष्यात अशा एक्सप्रेस व्यवहारांना आळा बसणार नाही, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT