जेएनपीए ः विठ्ठल ममताबादे
उरण तालुक्यातील खाडीच्या पांथळ भागात दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दाखल होणारे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो पक्षी यंदा एक महिना उशिरा दाखल झाले आहेत.
उरण शहराजवळ तेलीपाडा - नविनशेवा रोडलगत असलेल्या खाडीच्या पांथळ भागात त्यांचे अन्न असलेल्या माशांच्या शोधात शेकडोच्या संख्येने आलेल्या या फ्लेमिंगो पक्षांना पाहण्यासाठी रस्त्यावरील वाहचालक, पादचार्यांसह निसर्ग प्रेमिंची गर्दी होतांना दिसत आहे.
लांब चोच, उंच पाय आणि आकर्षक पंखांनी खुलून दिसणारे हे फ्लेमिंगो पक्षी अनेकांचे आकर्षण बनले आहेत. उरण तालुक्यातील पारंपरिक खाड्या आणि पांथळी जागा विविध प्रकलंपाच्या नावाखाली मातीचे भराव मोठ्या प्रमाणात करण्यात येऊन नैसर्गिक खाड्या आणि पांथळी जागा नष्ट होत असल्याने या मोठ्या संख्येने दाखल होणार्या परदेशी पक्षांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे मत निसर्ग प्रेमी व्यक्त करीत आहेत.
मागील काही महिन्यानंतर, यंदाच्या वर्षी हवामानाच्या बदलामुळे उशिरा या परदेशी फ्लेमिंगो पक्षांचे उरण तालुक्यात आगमन झाले आहे. सदरचे फ्लेमिंगो पक्षी हे उरण तालुक्यातील पाणजे, जसखार, नवीनशेवा - तेलीपाडा रोड, जासई व भेंडखळ येथील खाडीच्या लगत असलेल्या पांथळ क्षेत्रात त्यांचे अन्न असलेले भक्ष पाण्यातील मासे, बेडकी अन्य जिवाणू खाण्यासाठी विशेषतः सकाळ पासून ते दुपार पर्यंत पाण्यात वावरतांना दिसत असून त्यांच्या समवेत काळ्या रंगाच्या पाणकावळी,पांढर्या रंगाचे बगळे समाविष्ट झाल्याचे दिसून येत आहे.
ठाणे, नवी मुंबई, पनवेल या शहरांमध्ये खाडीकिनारा तसेच पाणथळींचे प्रमाण अधिक आहे. या परिसरात विविध प्रजातींचे पक्षी, लहान कीटक, फुलपाखरे, साप अशा वन्यजीवांचा अधिवास आहे. येथे दरवर्षी हिवाळा सुरू होताच विविध प्रजातीच्या परदेशी पक्ष्यांचे आगमन होत असते. नवी मुंबई शहरातील करावेमधील टी.सी.एस पाणथळीवर या पक्ष्यांचे आगमन झाले असल्याची माहिती पक्षीमित्रांनी दिली. पाम बीच मार्गावरील टी.सी.एस. आणि डी. पी. एस. परिसरातील पाणथळी विदेशी पक्ष्यांचे मुख्य आकर्षण आहे.
दरवर्षी या ठिकाणी फ्लेमिंगो तसेच विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे आगमन होते. राज्य सरकारने मध्यंतरी याच पाणथळींचे सर्वेक्षण केले आहे. या पाणथळी नाहीतच असे आक्षेप शासकीय यंत्रणांनी घेतल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये संताप आहे. या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास तुरळक प्रमाणात होत असल्याचा दावा काही बिल्डरांच्या प्रतिनिधींनी केला होता. गेल्या पंधरवड्यापासून या ठिकाणी दिसत असलेले नव्या पक्ष्यांचे थव्यांमुळे या पाणथळ जागा पर्यटकांसाठी पुन्हा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
एकंदरीत फ्लेमिंगो पक्षांना वावरण्यासाठी उरण तालुक्यातील विविध ठिकाणची त्यांची आश्रये व निवांर्याची गैरसोय होत असल्याने फ्लेमिंगो पक्षांचे जीवन उध्वस्त होण्याच्या मार्गांवर असल्याची गंभीर बाब असल्याचे निसर्ग प्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.विवेक केणी, निसर्गप्रेमी तथा अध्यक्ष, वन्यजीव निसर्ग संस्था उरण