Raigad News Pudhari
रायगड

Raigad News: काेकणाला गिळंकृत करताेय अरबी समुद्र; २० वर्षांत २५ टक्केहून अधिक किनारा बाधित

सुपीक जमीन दर्यागर्द

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: अरबी समुद्रावर ज्याची सत्ता तोच किनाऱ्यांवर आपले स्वराज्य प्रस्थापित करू शकतो, ही छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती होती. त्यानुसार त्यांनी जलदुर्ग व आरमाराची निर्मिती करून सागरावर सत्ता मिळवली आणि प्रजा सुरक्षित केली.

मात्र, आज अरबी समुद्रात मानवी हस्तक्षेप वाढला, समुद्र प्रदूषित झाला आणि हवामान बदलामुळे समुद्राची पातळी वाढून किनारी भाग गिळंकृत करण्याची भीषण समस्या उभी ठाकली आहे.

सोनेरी वाळू आणि नारळी-सुपारीच्या बागा ही कोकणची ओळख आता धोक्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीने (एनआयओ) उपग्रह व सागरी निरीक्षणांच्या आधारे प्रसिद्ध केलेल्या २०२६ च्या अहवालानुसार, अरबी समुद्राची पातळी वेगाने वाढत असून गेल्या दोन दशकांत कोकणचा तब्बल २५ टक्क्यांहून अधिक किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. शेती, बागायती आणि पिण्याचे पाणी खाऱ्या पाण्याखाली गेल्याने शेकडो हेक्टर जमीन थेट ‘दर्यागर्द’ झाली आहे.

महाराष्ट्राच्या ७२० किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीपैकी एक चतुर्थांश किनारा वेगाने खचत आहे. रायगड जिल्ह्यातील बाणकोट खाडीजवळील देवघर भागात गेल्या ३० वर्षांत ५५ हेक्टरहून अधिक सुपीक जमीन समुद्रात गेली आहे.

अलिबाग तालुक्यातील गणेशपट्टी आणि सिंधुदुर्गातील देवबाग ही गावे समुद्रात विलीन झाली आहेत. सखल व वाळूच्या किनाऱ्यांवर समुद्र ३०० ते ५०० मीटरपर्यंत जमिनीच्या आत घुसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वितळण्याचा वेग वाढला असून पाण्याचे औष्णिक प्रसरण होत आहे. यामुळे अरबी समुद्राची पातळी प्रतिवर्षी सरासरी ३.१५ मिलिमीटरने वाढत आहे. समुद्र जमिनीच्या आत ३ किलोमीटरपर्यंत घुसल्याने भूगर्भातील विहिरी व बोरवेलच्या गोड्या पाण्यात खारे पाणी झिरपले असून पिण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती आणि नारळी-सुपारीची बागायती धोक्यात आली आहे. खाऱ्या पाण्याने जमिनी कायमच्या नापीक ('खारलँड') बनत आहेत. कोकणातील १५०० किनारी वस्त्या धोक्याच्या छायेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT