विरारची प्राचीन जीवदानी देवी pudhari photo
रायगड

Jivdani Temple Virar : विरारची प्राचीन जीवदानी देवी

पुढारी वृत्तसेवा

नीती मेहेंदळे

मुंबईला लागून असलेल्या पण, आताच्या पालघर जिल्ह्यात विरार नावाचं एक प्राचीन शहर आहे. प्राचीन अशासाठी की, एका बाजूला तुंगारेश्वराचा डोंगर आणि कामणदुर्ग तर पायथ्याशी उत्तरेला पारोळ हे एक प्राचीन गाव, विरार रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला आगाशी एक अजून जुनं गाव आणि समुद्रात अर्नाळाचा जलदुर्ग. विरार स्टेशनच्या पूर्वेला डोंगरावर विरारची खूण म्हणून समजली जाणारी 'जीव‍दानी देवी' हे एक महत्त्वाचं शक्तिस्थान म्हणून ओळखलं जातं.

जीवदानी देवी ज्या डोंगरावर निवास करते, तो शिवकालातला जीवदानी किल्ला आहे. 17व्या शतकात या टेकडीवर हा किल्ला अस्तित्वात होता. किल्ल्याच्या तटबंदीच्या आत प्राचीन दिसणाऱ्या काही गुहा आणि पाण्याची टाकी आहेत; त्यांपैकी बहुतेक टाकी आता जवळपास कोरडी पडली आहेत. किल्ला असल्यामुळे गिर्यारोहकांचीही इथे ये-जा असते. वैतरणा नदीच्या सान्निध्यात असलेलं जीवदानी पीठ हे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे.

विरार पूर्वेला रेल्वे स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर हा जीवदानी डोंगर आहे. डोंगराच्या पायथ्याशी एक शिवमंदिर असून शेजारी पापड खिंडीतही एक शिवमंदिर आहे. अशा प्रसन्न वातावरणात साहजिकच भाविकांना जीवदानीची ओढ लागते. पायऱ्या चढून आल्यावर येथे आजही तटाचे काही कोरीव दगड आढळतात. कालौघात या ऐतिहासिक किल्ल्याचे अस्तित्व नष्ट झाले. अज्ञात शिल्पकारांनी तयार केलेल्या गुंफा आजही येथे आहेत.

जीवदानी देवीचे आजचे मंदिर जीर्णोद्धारीत असले तरी मूळ मंदिर हे पांडवकालीन असल्याचे भाविक सांगतात. श्री जीवदानी ही विरारची जीवनदायिनी असून ५१ शक्तीपीठांपैकी एक समजले जाते. इतर देवस्थानांच्या असतात तशा या जीवदानीच्या मंदिराच्या उत्पत्तीबद्दलही काही आख्यायिका आहेत. सहसा या आख्यायिका आजूबाजूच्या निसर्गाच्या अनुषंगाने असत. सोबत वैतरणा नदी आहे मग त्या आख्यायिकेत तिचा संदर्भ आलेला दिसतो. त्यातली एक प्रचलित आख्यायिका अशी आहे, जी पांडवांच्या संबंधात आहे. सहसा प्राचीनता दाखवण्यासाठी निदर्शक म्हणून पांडवकालीन म्हणण्याची प्रथा भारतात आहे.

जीवदानी देवीची पौराणिक कथा पुढीलप्रमाणे आहे. वनवासादरम्यान पांडव 'शूर्पारक' येथे आले. त्यांनी भगवान परशुरामांनी प्रतिष्ठित केलेल्या विमलेश्वराच्या मंदिराला भेट दिली आणि प्रभास क्षेत्राकडे जाण्याच्या प्रवासात वैतरणा नदीच्या काठावर मुक्काम केला. तिथे 'विरार तीर्था'च्या काठावर त्यांनी भगवती एकवीरेची पूजा केली. तसेच तिथले शांत, भव्य निसर्गसौंदर्य पाहून त्यांनी जवळच्या पर्वतांमध्ये गुहा खोदण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी जवळच्या टेकड्यांवर तसे केले आणि एका गुहेत एकवीरा देवीच्या 'योगलिंगा'ची स्थापना करून तिची पूजा केली. त्यांनी तिला 'भगवती जीवदानी' असे संबोधले. याच काळात पांडवांनी शिरगावपासून सुमारे १ मैल अंतरावर ऋषी मुनींसाठी लहान गुहांचा एक समूहही तयार केला, जो आता 'पांडव डोंगरी' म्हणून ओळखला जातो. अनेक योगी 'पांडव डोंगरी'मध्ये वास्तव्य करत असत आणि जीवदानी देवीचे दर्शन घेत असत.

दुसरी एक आख्यायिका सांगते, कलियुगाची सुरुवात आणि बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यानंतर वैदिक योग्यांची संख्या कमी झाली व हळूहळू लोक त्या टेकडी व देवीला विसरले. जगद्गुरू शंकराचार्यांच्या काळात विरारमध्ये एक व्‍यक्ती राहत असे, जो गावातील गुरे चारण्याचे काम करत असे. तो जगद्गुरू शंकराचार्य पद्मनाभ स्वामींच्या दर्शनासाठी निर्मळ गावातल्या मंदिरात गेला आणि त्याने त्यांना विनंती केली की, त्याला त्याच्या प्रिय कुलदेवतेचे दर्शन व्हावे यासाठी त्यांनी आशीर्वाद द्यावा. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन जगद्गुरूंनी त्याला सल्ला दिला की, त्याने जीवदानीच्या पायथ्याशी 'गो-माते'ची सेवा करावी; योग्य वेळी त्याला त्याच्या देवीचे दर्शन होईल आणि तो सद्गती प्राप्त होईल.

त्याने आयुष्यभर जगद्गुरू शंकराचार्यांच्या या सल्ल्याचे तंतोतंत पालन केले आणि गावातील गुरे चारली. गुरे चारत असताना त्याला एक गाय दिसायची जी इतर गाईंसोबत चरत असे, पण तिच्या मालकाने त्या गायीला चारल्याबद्दल त्याला कधीच मोबदला दिला नव्हता. आपल्या सत्कर्मामुळे त्याने त्या गायीचा मालक शोधण्याचे ठरवले. तो त्या गायीच्या मागे मागे जीवाधान टेकडीच्या शिखरावर गेला. तिथे त्याला दिव्य रूपातील एक सुंदर स्त्री दिसली. त्याला जगद्गुरू शंकराचार्यांचे शब्द आठवले आणि ती दुसरी कोणी नसून आपली कुलदेवी 'जीवदानी'च आहे हे त्याला समजले.

तो आनंदाने भारावून गेला आणि त्याने विचारले, "हे माते! मी तुझी गाय चारली आहे, तर तू मला तिचे मूल्य देणार नाहीस का?" देवी आनंदाने हसली व त्याच्या हातात काही पैसे ठेवणार, इतक्यात तो म्हणाला, "मला स्पर्श करू नकोस, मी अपृश्‍य आहे. मला अशी काहीतरी वस्तू दे जी स्पर्श, शब्द, गंध, रूप आणि आकाश (पंचमहाभूते) यांच्या संपर्काने दूषित होणार नाही." हे ऐकून देवीने विचारले, "अरे बाळा, तुला वर्णाश्रम धर्म आणि मोक्ष धर्माचे हे अद्वितीय ज्ञान कोठून मिळाले?" त्यावर तो उत्तरला, "केवळ जगद्गुरू शंकराचार्यांच्या कृपेनेच." हे ऐकून भगवती प्रसन्न झाली व म्हणाली, "तुझ्या पुण्याईमुळे हे पाहा - ही गाय दुसरी कोणी नसून 'कामधेनू'च आहे; तिनेच तुझ्या पूर्वजांना तिची शेपटीच्या सहाय्याने वैतरणी नदी पार करून उच्च लोकांत नेले आहे." असे बोलून झाल्यावर त्याने पाहिले की, ती गाय टेकडीच्या शिखरावरून खाली उडी मारत आहे; तिचे दोन पाय टेकडीच्या जमिनीवर पडले आणि उरलेले दोन पाय थेट वैतरणा नदीच्या पलीकडे स्थिरावले.

तेव्हा देवी म्हणाली, "तू ज्या गोष्टीची मागणी केली होतीस, म्हणजेच 'मोक्ष', तो मी तुला प्रदान करत आहे." असे म्हणताच त्याला मोक्ष प्राप्त झाले. त्याचक्षणी गायीने हृदयविदारक हंबरडा फोडला व कड्यावरून स्वत:ला झोकून दिले. या बलिदानाचे रहस्य अजून कोणाला उलगडले नाही. देवी गुहेत अंतर्धान पावणार इतक्यात, एका अपत्यहीन स्त्रीने हा सर्व दैवी चमत्कार पाहिला व ती आर्ततेने ओरडली, "देवी, अंबा! माझ्या मांडीवर 'जीवधन' म्हणून एखादे बाळ न देताच तू तुझ्या या कन्येला सोडून जाणार का?" तिच्या या प्रार्थनेने देवी प्रसन्न झाली, म्हणाली, "तू धन्य आहेस, जिने माझे दर्शन घेतले.

मी तुला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देते." तरीही त्या स्त्रीचे समाधान झाले नाही; ती म्हणाली, "हे त्रिलोकीच्या माते, केवळ मलाच आशीर्वाद देऊ नकोस, तर जी-जी कन्या तुझी भक्ती करेल, त्या सर्वांनाच तू संततीचे वरदान दे." हे ऐकून देवी अधिक प्रसन्न झाली, म्हणाली, "पुढे कलियुग येणार आहे. विधींची पवित्रता जपण्यासाठी मी या गुहेतील एका कोनाड्यातील छिद्रात वास्तव्य करेन. ज्या वंध्य स्त्रिया माहूरगड येथील माझ्या मूळ स्थानाप्रमाणेच या छिद्रात सुपारी अर्पण करतील, त्यांना संततीप्राप्तीचे फळ मिळेल." असे म्हणून देवी अंतर्धान पावली. त्या स्त्रीने ही घटना सर्वत्र सांगितली व त्यामुळे पुन्हा एकदा भाविक 'जीवधन' टेकडीवर येऊ लागले.

गायीने आपल्या जीवाचे दान केले म्हणून या डोंगराला जीवदानीचा डोंगर व तेथे वास करणारी आदिमाता म्हणून जीवदानी देवी प्रसिद्ध झाली. सध्या तेथील मूर्ती अगदी अलीकडच्या काळातील आहे; मात्र गुहेतील कोनाड्यातील ते छिद्र हेच मूळ गर्भगृह व पूजेचे मुख्य स्थान आहे. दसऱ्याला येथे मोठी यात्रा भरते. त्यानंतर इ.स.१९५६ मध्ये देवीच्या भक्तांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. देवीचे मंदिर नूतनीकरण केले असून, तिथे संगमरवरी देवीची सुंदर मूर्ती विराजमान आहे. डोंगरावर चढताना दुतर्फा हिरवीगार वनराजी आहे. मंदिरात जाण्यासाठी पाचपायरी हा जुना मार्ग असून येथून भाविक पायवाटेने जातात. आता पायथा ते डोंगरावर जोडण्यासाठी वणीच्यासप्तशृंगीप्रमाणे 'रोप-वे' करून मार्ग सुकर केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT