चिंभावे गावाची जागृत ग्रामदैवता आमजाई Pudhari Photo
रायगड

Aamjai Devi | चिंभावे गावाची जागृत ग्रामदैवता आमजाई

पुढारी वृत्तसेवा
खाडीपट्टा : रघुनाथ भागवत

कोकणची साधीभोळी माणसं आणि कोकणचे पर्यटन स्थळ हीच कोकणची खरी ओळख आहे, त्याचे कारण की, कोकणाला पर्यटनाबरोबरच आध्यात्मिक वारसा देखील मोठा लाभला आहे. कोकणात एकही गाव, वाडी नाही की तेथे त्या गावची रक्षणकर्ती आदिमाया ग्राम देवता नाही. सर्व गाववाड्यांमध्ये ग्रामदेवतेचे मंदिर पाहायला मिळते. खाडीपट्टयातील आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवरील टूमदार गाव चिंभावे हे निसर्गाच्या कुशीत वसलेले असून या ठिकाणी या गावाची जागृत ग्रामदेवता माता श्री आमजाई व माता श्रीदुर्गाई असून या ग्रामदेवताच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण गाव आनंदाने नांदत असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

हळदवणेवाडी, दत्तवाडी तसेच सुतारकोंड या चिंभावेतील प्रमुख वाड्यांचे हे ग्रामदैवत असून हळदवणेकोंड आणि सुतारकोंड या दोन्ही गावांच्या मध्यभागी एसटी स्टँड येथे माता आमजाई देवीचे भव्य दिव्य मंदिर असून माता श्री दुर्गाई या देवीचे स्थान हळदवणेवाडी वरून पुढे डोंगराकडे गेल्यास दुर्गाईचे एका पिंपळाच्या झाडाखाली वसलेले स्थान पाहायला मिळते. असे जरी असले तरी माता श्री आमजाई देवी व माता श्री दुर्गाई देवीचा नवरात्र उत्सवात एकत्र माता आमजाई मंदिर येथे घटस्थापना करून दसरा या विजय दशमीच्या दिवशी उत्सवाची सांगता केली जाते.

नऊ दिवस नऊ माळा चढवण्यापासून दररोज मनोभावे पूजन, आरती, जागरण दरवर्षी आळीपाळीने दोन्ही ग्रामस्थांकडून केले जाते. सुतारकोंड व हळदवणेकोंड हे आळीपाळीने दरवर्षी उत्सव साजरा करतात. यावर्षी हळदवणेकोंड ग्रामस्थांची उत्सव साजरा करण्याची पाळी असून सदर ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहाने या ठिकाणी हा सण साजरा केला जात आहे. दररोज कित्येक भाविक भक्तगण या ठिकाणी येऊन आपल्या मातेच्या चरणी नतमस्तक होऊन कोणी मातेच्या चरणी ओटी भरतो, तर कोणी देवीसाठी दागिने, साडी तसेच मिठाई आणून देवी समोर नतमस्तक होताना देखील पाहायला मिळतात. या देवींचा छबीना शिमगोत्सव होत असतो. होळी लागल्यानंतर दुसर्‍या दिवशी देवीच्या साना भरल्या जातात आणि त्यानंतर सानेवर देव छबिण्यासाठी मोठ्या उत्साहाने ढोल, सनईच्या गजरात वाजत गाजत पालखीमध्ये माता श्री आमजाई व माता श्री दुर्गाई या दोन देवी व भाचा केदारेश्वर बसवून सर्वप्रथम सुतारकोंड या गावामध्ये पालखी नेली जाते आणि त्यानंतर दुसर्‍या दिवशी हळदवणेकोंड या ठिकाणी पालखी नेली जाते.

ग्रामदेवता नवसाला पावणारी असून वर्षभर येणारे देवीचे विविध उत्सव देखील ग्रामस्थ मंडळ मनोभावे पार पडतात. ग्रामस्थ मंडळ सुतारकोंड व हळदवणेकोंड या दोन्ही गावांची ही ग्रामदेवता रक्षणकर्ती असून ग्रामस्थांची मोठी श्रद्धा या मातेवर असल्याचे ग्रामस्थांनी सांगून देवीच्या पावनकृपाशीर्वादाने गावातील सारे वातावरण शांतमय असून गाव एक दिलाने व एकोप्याने नांदत आहे.

भाविकांमध्ये उत्साह

देव आपल्या घरी येतोय ही कल्पनाच या सर्व ग्रामस्थांसाठी मोठी भाग्याची असून मुंबई, ठाणे तसेच पुणे या ठिकाणी कामानिमित्त स्थायिक झालेले सर्व श्रद्धेय भाविक देखील आपल्या ग्रामदेवतेच्या स्वागतासाठी आणि पूजेसाठी, ओठ्या भरण्यासाठी मनोभावे घरी येऊन गावातील प्रत्येक घर मोठ्या उत्साहाने नागरिकांनी भरलेला पाहायला मिळतो. ग्रामदेवतांची पालखी भक्तमंडळी खांद्यावर घेऊन घराच्या अंगणात नेतात आणि आपल्या मनोकामना, इच्छा यांचे ग्राहने देवीपुढे मांडून कोणी नवस बोलतो, तर कोणी नवस पूर्ण झालेले नवस फेडत असतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT