पोलादपूर: या वर्षीच्या हंगामात पावसाने दमदार हजेरी लावत जुलै महिन्याच्या सुरवातीपासून शेवटच्या टप्यात जोरदार पर्जन्यवृष्टी करत २ हजार २०० मी मी ची सरासरी गाठत वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडल्याने तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीचे भय चालू वर्षी सुद्धा जाणवत असले तरी सुदैवाने जीवित हानी टळली आहे.
२४ जुलै पर्यंत तालुक्यातील पावसाची सरासरी २२०० मी.मी. असल्याचे आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यलय मधून सांगण्यात आले. सद्य स्थितीत ७ गावातील ७८ कुटुंबातील २०० घरे आदींचे नुकसान झाले आहे तर महामार्ग वरील कशेडी घाटात दरडीचे सातत्य सह आंबेनळी घाटात पडणारी दरड बंद करण्यात आलेले मार्ग नैसर्गिक आपत्तीच्या आठवणी करून देत आहेत.
तालुक्यातील वाकन, कोंढवी, पोलादपूर, कीनेश्वर, दाभिल, तुर्भे खोडा, सवाद, बोरावले, गोवले, चांदके, पळचिल गोळेगणी, कोंढवी या ठिकाणी पडणार पाऊस व डोंगरे भाग व घाट माथ्यावर कोसळणाऱ्या सरी लक्षात घेता तालुक्यातील सरासरीच्या ७० टक्के पाऊस जुलै महिन्याच्या २३ पर्यंत झाला आहे या वर्षी वेधशाळेने नोंदविले निर्देश लक्षात घेता यावर्षी तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे.
२०२१ च्या महापुरात तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे गावावर दरड कोसल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता अनेक जण बेघर झाले होते. पाच वर्षे नंतर या दोन्ही गावातील आपत्तीग्रस्त ग्रामस्थांना जागांचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे.
२५ व २६ जुलै २००५ या अतिवृष्टी व भूस्खलन तसेच महापूर आल्याच्या नैसर्गिक आपत्तीनंतर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती निवारण कक्ष पावसाळी कार्यरत ठेवण्यात येत आहे. या सन २००५ च्या नैसर्गिक आपत्तीनंतर कोतवाल खुर्द आणि बुद्रुकच्या दरडग्रस्तांसाठी २८ घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र तर कोंढवी येथे २९ घरकुलं उभी राहतील एवढे क्षेत्र उपलब्ध करण्यात येऊन पुनर्वसनाचे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले होते सिध्दीविनायक ट्रस्ट, मुंबईने याकामी खर्चाची जबाबदारी उचलली.
कोतवालमध्ये दरडग्रस्तांची संख्या ४८ तर कोंढवी येथे ७८ कुटूंबे अशी असताना दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४५ लाख रूपये खर्चातून केवळ १५-१५ घरकुलं उभारण्यात आली. मात्र बांधण्यात आलेल्या घराचा दर्जा २० वर्षात खालावला असल्याचे चित्र दिसत आहे.
अतिवृष्टीमध्ये झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदार कपिल घोरपडे सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी सामाजिक संस्था लोकप्रतिनिधी स्थानिक ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने परिस्थितीवर मात करत भूत्खलन झालेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात प्रशासनाने मोलाची भूमिका बजावली आहे.
यामध्ये नाणेघोळ ३२ कुटुंबातील ६७ नागरिकांना, गावातील सोनारवाडी मंदिरात स्थलांतरित करण्यात आले त्याचप्रमाणे क्षेत्रफळ धनगरवाडी येथील ५ कुटुंबातील २६ नागरिक, निवारा केंद्र मध्ये, पोलादपूर वडघर सोनारवाडी २ कुटुंबातील ७ सदस्य अंगणवाडी येथे स्थलांतरित, मोरसडे आडाची वाडी ३ कुटुंबातील ९ सदस्य यांना सखाराम शिंदे यांच्या घरी, ओंबली हनुमानवाडी येथील १४ कुटुंबातील २५ जणांना समाज मंदिर मध्ये स्थलांतरित करण्यात आले होते.
नैसर्गिक आपत्तीमध्ये तालुक्यातील ६ गाय, २ म्हैस मृत्युमुखी झाली तर २ लहान जनावरांचा मृत्यू झाला आहे तर पूर शिरल्याने १५१ घराचे नुकसान झाले होते तर ५४ पक्की घराचे किरकोळ तर ९ कच्ची घराचे अंशतः नुकसान झाले आहे. ३ झोपडी ९ गोठे याचे नुकसान झाले होते त्याच प्रमाणे ५ ते ७ जुलै दरम्यान आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने २५ दुकानाचे नुकसान झाले होते.
पंचनामे अंतिम टप्यात
गेल्या काही दिवसात पोलादपूर तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे अंतिम टप्यात असल्याची माहिती आपत्ती निवारण मार्फत देण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात व दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसात आपत्ती ओढवली होती.