महापूरानंतर पाहणी करताना त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार दिसत आहे. pudhari photo
रायगड

Amba River flood | कशी ग वैरीण झाली अंबा नदी ; 35 वर्षांपूर्वीच्या महापुराच्या आठवणी आजही ताज्या

हजारो संसार पाण्यात वाहून गेले होते

पुढारी वृत्तसेवा
नागोठणे : महेंद्र माने

23 जुलै 1989 ती काळरात्र आजही नागोठणेकरांच्या कायमची लक्षात राहिली आहे.आज त्या घटनेला बरोबर 35 वर्षे झाली आहेत. नेहमी संथ वाहणारी या दिवशी अंबा नदी जणू कोपली होती...वैरीण होऊन ती दर्‍याखोर्‍यातून वाहत होती. तिचे ते रौद्ररुप पाहून अंबेच्या काठावरील हजारो संसार पाण्यात वाहून गेले होते.हजारो एकर जमीन जलमय झाली होती.कोट्यवधींची वित्तहानीचाही फटका नागोठणे,जांभूळपाडा या गावांना बसला होता.आजही त्या महापुराच्या आठवणी निघाल्या की अंगाचा थरकाप उडतो.गेल्या पस्तीस वर्षात दरवर्षी महापूर आले पण त्यातून कायमची सुटका करण्यात मात्र एकाही राज्यसरकारला शक्य झाले नाही याची खंत मनाला टोचून जाते.

23 जुलै 1989 ची काळी भयाण रात्र

नागोठणेकरांना पूर काही नव्याने सांगायला नको. असाच कुणाच्याही ध्यानी-मनी नसणारा व आता सांगून खरंही न वाटणारा महाप्रलय नागोठणे गावात आला. तो दिवस होता रविवार दि. 23 जुलै 1989 ची काळी भयाण रात्र. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. या दिवशी नागोठणे गावाच्या परिसरातील आदिवासीवाड्या व खेडेगावातून लोक किराणा सामान, कांदे-बटाटे व भाजी-पाला तसेच मटण-मच्छी घेण्यासाठी नागोठणे गावात येत असत. त्यामुळे व्यापारी मंडळी आपल्या दुकानात भरपूर प्रमाणात माल भरून ठेवत. त्यात पावसाळा म्हणजे जरा जास्तच माल. त्या रात्री बाजारपेठेतील तसेच बस स्थानकाशेजारील लहान-मोठे टपरीवाले आपला उद्योग-धंदा करून रात्री झोपीही गेले. परंतु पावसाने आपला रुद्रावतार धारण केला होता. जाणकारांनी नदी किनारी जाऊन नदीतील पाण्याचा अंदाज घेतला व पुर येण्याची लक्षण काही दिसत नसल्याचे सांगितले. थंडगार वा-याच्या झोतात नागोठणेकर मंडळी गाढ झोपी गेली. रात्री साधारण एक-दोनच्या सुमारास नदी किनारची कोळी बांधव पूर आलाऽऽऽ पूर आलाऽऽऽ ...म्हणून ओरडत आली. त्यांच्या पाठोपाठ बाजारपेठ, खालचीआळीतील लोकही आपल्या बायका मुलांना घेऊन आली.

महापुराने परिसर वेढला

गावात साधारण पंधरा ते वीस फूट पाणी शिरुन कोळीवाडा, बाजारपेठ, खालचीआळी, बंगलेआळी, खडकआळी, गुरवआळी, दोन्ही मोहल्ले, सरकारी दवाखाना तसेच कचेरी शाळेचा परिसर अशाप्रकारे या महापुराने गावाचा 80 टक्के परिसर पाण्याखाली घेतला. उरल्या त्या गवळआळी, कुंभारआळी, मराठाआळी व आंगरआळी. यांचाच आधार शेवटी पूरग्रस्त नागरिकांनी घेतला. पुराचे पाणी काही केल्या कमी होत नव्हते. पुराच्या पाण्यामुळे सर्वत्र चिखलच चिखल झाला होता. त्यामध्ये विजेचे पोल पडले होते. काही घरे, झाडे पडली होती, मोटार सायकली वाहून गेल्या, लहान लहान टपर्‍या तर कुठे गायब झाल्या समजलेच नाही. बहुतेकांचे संसार वाहून गेले होते. जीवनावश्यक वस्तुंचा अक्षरशः चिखलच झालेला होता. ते पाहताना सर्वांचेच डोळे पाणावले होते. कुणी कुणाचे सांत्वन करायचे हाच प्रश्न सर्वांपुढे होता. गावात कोणतेही वाहन येत नव्हते. कारण गावातील सर्व रस्ते पुराने वाहून गेले होते. रोहा भिसेखिंडीत झाडे पडली होती, पेण व पाली रस्ता वाहून गेला, वाकण गावाजवळील पूलाच्या दोन्ही बाजूकडील भराव वाहून गेला होता.

मदतीचा ओघ वाढला

पेण रस्ता साफ केल्यानंतर बाहेर गावावरून मदत येऊ लागली. त्यामध्ये धान्य, कपडे, भांडी, बिस्किटे, पाण्याच्या बाटल्या, औषधे येऊ लागली. इतर गावातील लोक गाव साफ करायला आली. त्यात आर.एस.एस.च्या स्वयंसेवकांचा सहभाग मोठा होता. नातेवाईकसुद्धा येत होते. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे, जिल्हा परिषद अध्यक्ष, डॉक्टरांचे पथक तसेच सरकारी आधिकारी यांसारख्या मान्यवरांनी गावात भेटी देऊन आस्थेने चौकशी करून धीर दिला. पण वित्तहानी मोठया प्रमाणात झाली या वित्तहानीने नागोठणे गाव 10 ते 15 वर्ष जवळ-जवळ मागे गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT