नागोठणेकरांना एका रात्रीत होत्याचे नव्हते करणारा 23 जुलै 1989 रोजी अंबा नदीला आलेल्या महाप्रलयाच्या आठवणीं आज 36 वर्षांनीही ताज्या आहेत. मन हेलाहून टाकणारी ती भयाण काळी रात्र अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करून गेली.
23 जुलै 1989 चा पूर म्हणजे पूूर कसला? तो महाकाय महापूरच म्हणायचा. नागोठणेकरांच्या कायम लक्षात राहणार कारण गुण्या-गोविंदाने नांदत असलेला गावाचे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. जणू काय आमची अंबा नदी आमच्यावर कोपली असे नागोठणेकर सांगतात.
पावसाळ्यात दरवर्षी नागोठणे गावात तीन-चार वेळा पुर येतोच. पुराचे पाणी नदीकिनारी असणारे एस.टी. स्थानक, कोळीवाडा, मच्छीमार्केट फार फार तर बाजारपेठेत घुसत असत. एक नागोठणेकर सांगतात, आमचे घर नदीपासून फार लांब व उंच ठिकाणावर आहे. तरीही आम्ही सर्व मित्र-मंडळी पूर आला की, पुराच्या पाण्यात होडीत बसून फेरफटका मारणे, पाण्यात मस्ती करणे तसेच पूरग्रस्तांना त्यांच्या घरातून बाहेर काढणे, त्यांचे सामान सुरक्षित ठिकाणी ठेवणे, बाजारपेठेतील दुकानातील सामान इतर ठिकाणी हलवणे तसेच पाण्यातील मज्जाही करीत असतो. असाच कुणाच्याही ध्यानी-मनी नसणारा व आता सांगून खरंही न वाटणारा महाप्रलय नागोठणे गावात आला. तो दिवस होता रविवार, 23 जुलै 1989 ची काळी भयाण रात्र. रविवार म्हणजे बाजाराचा दिवस.
या दिवशी नागोठणे गावाच्या परिसरातील आदिवासीवाड्या व खेडेगावातून लोक किराणा सामान, कांदे-बटाटे व भाजी-पाला तसेच मटण-मच्छी घेण्यासाठी नागोठणे गावात येत असत. त्यामुळे व्यापारी मंडळी आपल्या दुकानात भरपूर प्रमाणात माल भरून ठेवत. त्यात पावसाळा म्हणजे जरा जास्तच माल. त्या रात्री बाजारपेठेतील तसेच बस स्थानकाशेजारील लहान-मोठे टपरीवाले आपला उद्योग-धंदा करून रात्री झोपीही गेले. परंतु पावसाने आपला रुद्र अवतार धारण केला होता. जाणकारांनी नदी किनारी जाऊन नदीतील पाण्याचा अंदाज घेतला व पुर येण्याची लक्षण काही दिसत नसल्याचे सांगितले.
थंडगार वा-याच्या झोतात नागोठणेकर मंडळी गाढ झोपी गेली. रात्री साधारण एक-दोनच्या सुमारास नदी किनारची कोळी बांधव पुर आलाऽऽऽ पुर आलाऽऽऽ ...म्हणून ओरडत आली. त्यांच्या पाठोपाठ बाजारपेठ, खालचीआळीतील लोकही आपल्या बायका मुलांना घेऊन आली. आमचे घर नदीपासून जरा लांबच आहे. आम्ही व शेजारील लोकांनी या लोकांना धीर दिला व नेहमीप्रमाणे घरात घेतले. साधारण आणखी दोन तासांनी आमच्याही घराच्या पायरीला पाणी लागले व ते जोरात वाढू लागले जेव्हा पाणी घरात शिरून आमच्या कंबरेपर्यंत लागले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले की, एवढे पाणी आले कुठून? घरात पाणी जोरात वाढू लागल्याने लोकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते म्हणून आम्ही तरुणांनी दोर बांधून घरातील व आजू-बाजूच्या लोकांना पाण्याबाहेर काढले आणि शंकर व ग्रामदैवत जोगेश्वरी मंदिरामध्ये सुरक्षित ठेवले व आम्ही इतरांना मदत करण्यासाठी बाहेर पडलो. तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला व जोरात मोठा आवाज झाला.
काळोखात काही दिसत नव्हते कारण वीज तर केव्हाच गूल झाली होती. जरा अंदाज घेतल्यावर समजले की, आमच्या शेजारचे दिवेकर यांचे घर पत्यासारखे कोसळले व सर्व सामान आमच्या समोर वाहत जात होते; परंतु आम्ही काहीही करू शकत नव्हतो; कारण पाण्याच्या लाटा म्हणजे महासमुद्राच्या लाटा वाढत होत्या. गावात साधारण पंधरा ते वीस फुट पाणी शिरुन कोळीवाडा, बाजारपेठ, खालचीआळी, बंगलेआळी, खडकआळी, गुरवआळी, दोन्ही मोहल्ले, सरकारी दवाखाना तसेच कचेरी शाळेचा परिसर अशाप्रकारे या महापुराने गावाचा 80 टक्के परिसर पाण्याखाली घेतला.
उरल्या त्या वळआळी कुंभारआळी, मराठाआळी व आंगरआळी. यांचाच आधार शेवटी पूरग्रस्त नागरिकांनी घेतला. पुराचे पाणी काही केल्या कमी होत नव्हते. 24 तारखेच्या संध्याकाळनंतर पाणी हळू हळू कमी होऊ लागले. गावातील 70 टक्के लोक गाव सोडून गेली होती. आजही या महापुराची आठवण आली तरी अंगावर काटा व शहारे उभे राहतात.
या महापुराचा फटका नागोठण्यासह रोहा,वाकण,पाली,पेण यांसारख्या शहरांसह असंख्य खेडेगावांना बसलाच; परंतु जांभूळपाडयामध्ये आलेल्या महापुरात वित्तहानीसह जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली होती.