(file photo)
रायगड

Devendra Fadnavis | आम्ही तिघेही रायगडचे पालकमंत्रीच : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्र्यांकडून पत्रकारांच्या प्रश्नाला बगल

पुढारी वृत्तसेवा

महाड : नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला असला तरी रायगडच्या पालकमंत्रीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पदासाठी उत्सुक असलेल्या रोहयो मंत्री भरत गोगावले यांनीही आपणच रायगडचे पालकमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, त्यांनी पालकमंत्रीपदाचा दावा केला असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यास बगल देत फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही रायगडचे पालकमंत्री असल्याचे महाडमध्ये जाहीर केले आहे.

मागील तीन महिन्यापासून प्रलंबित असलेल्या रायगड पालकमंत्री पदासंदर्भात महाड येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात विचारणा केली असता रायगडचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार काम बघत असल्याचे सांगून पत्रकारांच्या प्रश्नालाने बगल दिल्याचेच दिसून आले.

मागील तीन महिन्यापूर्वी युती शासन स्थापन झाल्यानंतर शासनाकडून आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आले होते मात्र शिवसेनेच्या तीन आमदारांनी या संदर्भात घेतलेल्या तीव्र हरकती व आक्रमक पवित्रा यानंतर परदेशात असलेल्या मुख्यमंत्र्यांना नाशिक व रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात स्थगिती आदेश देणे भाग पडले होते. चार दिवसापूर्वीच नाशिक येथील पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन यांची पुनर्नियुक्ती करून हा प्रश्न निकाली निघाला असला तरीही रायगड पालकमंत्री पदाचा वाद राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटामध्ये आजही कायम राहिल्याचे दिसून येते. यामुळेच महाड येथे आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा महाडकर नागरिक तसेच या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत होती, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून अजूनही या संदर्भातील असलेला तिढा सुटलेला नसल्याचेच दिसून येत आहे

गोगावले यांचे ग्रामदेव श्री विरेश्वरला साकडे

रायगडच्या पालकमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. महाडमध्ये सध्या छबिनोत्सव सुरू आहे. या निमित्ताने गोगावले यांनी विरेश्वर महाराजांच्या चरणी लीन होताना पालकमंत्रीपद मलाच मिळू दे, अशी प्रार्थना केली. तसे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुचितही केले. आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत जे जे मिळाले ते सर्व विरेश्वरच्या कृपेने मिळालेले आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदही मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT