Alibaug bird species record
अलिबाग : फणसाड वन्यजीव अभयारण्यात २० ते २२ मार्च दरम्यान झालेला “फणसाड बर्ड काउंट 2026” उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रीन वर्क्स ट्रस्ट, SBI फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमात देशभरातील ३७ पक्षीनिरीक्षक, २२ स्वयंसेवक आणि १८ वन कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी १३ पथकांमध्ये विभागून अभयारण्यातील २६ ठिकाणी जाऊन पक्षी आणि इतर प्राण्यांची नोंद केली. जंगल, डोंगर, ओढे अशा विविध भागात पायी फिरून ही गणना करण्यात आली.
या सर्वेक्षणात एकूण १५४ पक्षी प्रजाती आढळल्या. याशिवाय ५० फुलपाखरे, २४ सस्तन प्राणी, २० सरीसृप आणि १३ उभयचर प्रजातींचीही नोंद झाली. काही दुर्मिळ आणि धोक्यातील पक्ष्यांचाही यामध्ये समावेश आहे.
या उपक्रमासाठी सहभागींना आधी प्रशिक्षण देण्यात आले होते. नंतर तज्ज्ञांनी सर्व माहिती तपासून खात्री केली. एकूण २,२७८ नोंदी या तीन दिवसांत करण्यात आल्या.
हा उपक्रम “सिटिझन सायन्स” प्रकारातील असून, यामधून मिळालेली माहिती पुढील काळात वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयोगी पडणार आहे. फणसाड अभयारण्यातील जैवविविधतेचे महत्त्व या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.