रायगड

Alibaug drain cleaning failure : अलीबागच्या नालेसफाईची पहिल्याच मोठ्या पावसात पोलखोल

अलिबाग नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून नालेसफाई केल्याचा दावा केला होता; मात्र पहिल्याच पावसात तो फोल ठरला

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे अलिबाग शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठ जलमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालक, पादचारी, व्यापारी आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे, अलिबाग नगरपरिषदेने पावसाळ्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून नालेसफाई केल्याचा दावा केला होता. मात्र, पहिल्याच दमदार पावसात शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने नगरपरिषदेचा हा दावा पूर्णपणे फोल ठरल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

मुख्य रस्ते, चौक आणि सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. अनेक दुचाकीस्वारांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली, तर काही ठिकाणी दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली. शहरातील अनेक नाल्यांमधून पावसाचे पाणी सुरळीत वाहून न गेल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

याच पार्श्वभूमीवर अलिबाग नगरपरिषदेच्या नालेसफाईच्या कामांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईवर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर साचल्याने या कामांच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त केला जात आहे.

शहरातील विरोधी पक्षासह अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. "नालेसफाईची कामे खरोखरच शहरवासीयांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये म्हणून करण्यात आली होती की संबंधित ठेकेदारांच्या सुखसोयी आणि आर्थिक फायद्यासाठी?" असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याने संबंधित कामांची चौकशी करून दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पावसाळ्याची सुरुवात होताच अलिबागची ही अवस्था समोर आल्याने आगामी काळात मुसळधार पाऊस झाल्यास शहरातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेने केवळ कागदोपत्री दावे न करता प्रत्यक्षात जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अलिबागकरांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT