अलिबाग (रायगड ) : चोंढी गावातील तब्बल १२ वर्षांपूर्वी घडलेल्या मारामारी प्रकरणातील निकाल जाहीर झाल्यानंतर निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव (वय ३८) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ आणि अन्य काही साथीदारांना शिक्षा ठोठावण्यात आली होती, तर काही जणांना निर्दोष मुक्त करण्यात आले. याच निर्दोष सुटलेल्या नितेश सुनील गुरव या इसमाने निकाल लागल्यानंतर काही तासांत प्राण सोडल्याचे समजते.
रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाज कल्याण सभापती दिलीप विठ्ठल तथा छोटमशेठ भोईर आणि त्यांचे २० साथीदार अशा एकूण २१ जणांना बारांवर्षांपूर्वी ११ सप्टेंबर २०१२ रोजी चोंढी येथील कॉम्प्यूटर क्लासमध्ये घुसुन केलेल्या सशस्त्र हल्ला आणि ठार मारण्याचा प्रयत्न या प्रकरणी, रायगड जिल्हा मुख्य सत्र न्यायाधिश राजेंद्र सावंत यांनी दोषी ठरवून सात वर्ष सक्तमजूरी आणि प्रत्येकी ७३०० रुपये अशी शिक्षा सुनावली. मात्र या खटल्यात न्यायालयाने निर्दोषमुक्तता केलेले नितेश सुनील गुरव (वय ३८) यांचा निकालानंतर काही तासांतच आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर शिक्षा झालेल्या आरोपींची न्यायालयातील दंड भरणे व अन्य कार्यालयीन प्रक्रीया पूर्ण झाल्यावर या सर्व आरोपींना गुरुवारी रात्री येथील हिराकोट शासकीय कारागृहात नेण्याची तयारी पोलीसांनी केली. त्यावेळी या खटल्यातील प्रमुख आरोपी माजी जि.प. सभापती दिलीप विठ्ठल तथा छोटमशेठ भोईर, जयवंत साळुंखे, गणेश म्हात्रे आणि अशोक थळे या चौघांची तब्येत अचानक बिघडल्याने या चौघांना कारागृहात नेण्या ऐवजी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान शिक्षा झालेल्या उर्वरित १७ आरोपींना शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तळोजा कारागृहात हलविण्यात आले असून तेथून राज्यातील विविध कारागृहात त्यांची रवानगी केली जाणार आहे.
न्यायालयीन चढ-उताराचा दीर्घ मानसिक ताण
निर्दोष मुक्त झालेला इसम नितेश गुरव हा या निकालानंतर न्यायालयाबाहेर आल्यानंतर काही काळ तो भावनिक अवस्थेत होता. सहकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, नितेश सुनील गुरव याने प्रकरणातील दीर्घ मानसिक ताण, न्यायालयीन चढ-उतार आणि निकालाचा ताण सहन न झाल्याने झिराड येथील घरी जातना अचानक छातीत दुखू लागले होते म्हणून नितेश सुनील गुरव याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला होता. परंतू, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.