अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिरकाव करत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत. भाजपचे उमेदवार ॲड. अंकित बंगेरा यांनी शेकाप–काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभय म्हामुणकर यांचा पराभव करत भाजपाचा अलिबाग नगरपरिषदेत प्रवेश निश्चित केला. या निकालामुळे शेकापला मोठा धक्का बसला आहे.
नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अलिबाग मध्ये शेकाप, काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. विकास आघाडीने थेट नगराध्यक्ष पदाच्या अक्षया प्रशांत नाईक यांना निवडून आणले. जिल्ह्यात सर्वात तरुण नगराध्यक्ष होण्याचा मान अक्षया नाईक यांनी मिळवला आहे.
रायगड जिल्ह्यातील 10 नगर पालिकेच्या 2 डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल तब्बल 19 दिवस पुढे ढकलण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते. सर्वांचे लक्ष रविवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे होते. अलिबाग मध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे वर्चस्व आहे. त्यांच्या नावाला वलय आहे. या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळवून दिले आहे. आणि आपला करिश्मा सिद्ध केला आहे शेकाप काँग्रेस आघाडीची सत्ता येणार. प्रशांत नाईक यांचाच वरचष्मा राहणार याची खात्री आघाडीचे नेते,कार्यकर्ते सुरुवाती पासून देत होते. विशेष म्हणजे प्रशांत नाईक हे निवडणूक पूर्वी बिनविरोध निवडून आले होते.
रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी अलिबाग मधून रिंगणात उतरलेल्या शेकापच्या अक्षया प्रशांत नाईक या सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या विजया मुळे आघाडीमध्ये जल्लोष पहायला मिळाला.
अलिबाग नगरपालिके मध्ये 20 नगरसेवक आणि नगराध्यक्ष अशी 21 जागांसाठी निवडून झाली. सुरुवाती पासून शेकाप,कांग्रेस आघाडीची हवा होती. 21 जागा येतीलच असा विश्वास व्यक्त केला जात होता.पण प्रत्यक्ष मतमोजणी नंतर शेकाप ,काँग्रेस आघाडीचे 17 उमेदवार निवडून आले. तर स्वतंत्र रिंगणात उतरलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संदीप पालकर आणि त्यांची पत्नी.. सौ. श्वेता संदीप पालकर हे दोघे निवडून आले.तसेच शिवसेना, भाजपा युतीचे ॲड अंकित बंगेरा निवडून आले .त्यामुळे नगरपालिकेत आता विरोधकांचा प्रवेश झाला आहे.