अलिबाग | यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. अलिबाग तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार वरुण संजयकुमार पाटील यांनी प्रत्येकी दोन डझनाच्या हापूसच्या चार आणि केशरची एक अशा पाच पेट्या आंब्याची काढणी करून मुंबई बाजारात पाठवल्या आहेत. वरुण पाटील यांनी सलग चौथ्या वर्षी हा मान मिळवला आहे. यातून चांगल्या मोबदल्याची त्यांना आशा आहे. या पहिल्याच पेटीला आठ हजारांचा घसघशीत भाव मिळाला आहे. वरुण पाटील यांची रोहा तालुक्यात आंब्याची बाग आहे.
यंदादेखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. लांबणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे आजार अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून वरुण संजयकुमार पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून रायगड जिल्ह्यातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे. याबाबत वरुण पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावर्षी कोकणात हापूसचे उत्पादन चांगले होईल. परंतु वातावरणात सातत्याने चढउतार पहायला मिळताहेत. नोव्हेंबर महिन्यात चांगली थंडी होती परंतु चेन्नई आणि ओरीसातील वादळामुळे ती कमी झाली. त्याचाही परिणाम जाणवतो आहे. हापूसच्या उत्पादनात वातावरणाची साथ महत्वाची आहे. वातावरणातील बदल धोकादायक आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांत हापूसचे उत्पादन 30 ते 40 टक्क्यांनी घटलंय, यंदा हापूसचे उत्पादन किती होईल याचा अंदाज फेब्रुवारीमध्ये येईल, असं वरुण पाटील यांचं म्हणणं आहे.
सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. ही परिस्थिती पाहता यंदा जानेवारी महिन्यात रायगडचा आंबा मुंबई बाजारात जाईल असे वाटत नव्हते. परंतु आमच्या कुटुंबातील वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि आमची मेहनत यामुळे हे शक्य झाले.