अलिबाग समुद्रात बुडालेले शशांक सिंग व पलाश पखर 
रायगड

Alibag Drown News | अलिबाग समुद्रात मुंबईतील दोन तरुण बुडाले; मित्रांसमोर घडली दुर्घटना

समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आत ओढले गेले : बचाव पथकाडून शोधकार्य सुरु

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : अलिबाग शहराजवळील सेशन कोर्टाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या चार मित्रांपैकी दोघे तरुण बुडाले. ही समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आत ओढले जाऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेनंतर पोलिस व स्थानिक प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई सानपाडा येथून चार मित्र अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते. सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास ते सेशन कोर्टाच्या पाठीमागील समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोन तरुण १) शशांक सिंग (वय १९, रा. उलवे, उरण) २) पलाश पखर (वय १९, रा. सानपाडा, नवी मुंबई) हे समुद्राच्या भरतीच्या प्रवाहात वाहून गेले व बेपत्ता झाले.

घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली असून सध्या समुद्रात व किनाऱ्यालगत तपास सुरू आहे. मात्र, रात्रीपर्यंत दोन्ही तरुणांचा शोध लागला नव्हता.

स्थानिक मच्छीमारांची मदत घेत समुद्रात शोध सुरू असून, कोस्ट गार्ड व आपत्ती व्यवस्थापन पथकांनाही माहिती देण्यात आली आहे. भरती-ओहोटीच्या परिस्थितीमुळे शोध कार्यात अडथळे येत असले तरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

अलिबाग पोलिसांनी आवाहन केले आहे की, “अलिबाग व परिसरातील समुद्रकिनाऱ्यावर एखाद्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह किंवा कपडे आढळल्यास तात्काळ अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.” या घटनेने अलिबाग परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनारी पर्यटकांनी पोहण्याच्या वेळी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT