अलिबाग: हुंड्याच्या पैशांसाठी विवाहित महिलेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्मिला प्रद्युम्न गुप्ता असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला हिचा २०२५ मध्ये प्रद्युम्न जोखन गुप्ता याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहावेळी सहा लाख रुपये हुंडा, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि एक तोळ्याची सोन्याची चैन देण्याचे ठरले होते. त्यापैकी काही रक्कम विवाहापूर्वी आरोपींच्या खात्यावर पाठविण्यात आली होती; मात्र काही रक्कम बाकी होती.
ही रक्कम देण्यावरून पती प्रद्युम्न गुप्ता, सासरे जोखन राघू गुप्ता आणि सासू मंजू जोखन गुप्ता हे उर्मिला हिला वारंवार टोमणे मारून मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचा आरोप आहे. तसेच अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यासाठी माहेराहून आणखी पैसे आणावेत, यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता.
या सततच्या छळाला कंटाळून उर्मिला हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील विविध भागात आजही विवाहित महिलांचा हुंड्यासाठी छळ करण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हुंड्याविरोधात जनजागृती आवश्यक आहे.