रायगड ः जयंत धुळप
रायगड जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील पूल व स्लॅब कलवर्ट (छोटे पूल) यांचे स्ट्रक्चरल ऑडीट (संरचनात्मक धोके तपासणी) करण्यात आले असून त्यांच अलिबाग तालुक्यांतील आठ पूल संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आल्याने रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या आठ पुलांवरून अवजड वाहनांच्या वाहतुकीस तत्काळ बंदी करणारा आदेश बुधवारी जारी केला आहे.
व्हीजना कन्स्लटींग इंजीनिअरींग प्रा.लि.या संस्थेमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे व भाकरवड-देहेन या मार्गांवरील एकूण आठ पुलांची भार क्षमता अत्यल्प म्हणजे 5 ते 16 टन झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी या आठ पुलांवर अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे.
पावसाळ्यामुळे पूल अधिक असुरक्षित झाल्याने वाहनचालकांनी व ट्रान्सपोर्ट संस्थांनी प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करावे. अपघात टाळण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही कार्यवाही करण्यात आली आहे. हा आदेश पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असून, नियमभंग करणार्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आहे.