आक्षीचा शिलालेख pudhari photo
रायगड

Marathi Bhasha Din : मराठी भाषेची शान, आक्षीला मिळतो मोठा मान

1013 वर्ष प्राचीन मराठीतील पहिल्या शिलालेखाचे जतन आणि संवर्धन

पुढारी वृत्तसेवा

रायगड ः जयंत धुळप

आक्षीचा शिलालेख हा शा.श. 934 म्हणजेच इ.स. 1012 मधील मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. तब्बल 1013 वर्षांचा हा प्राचीन शिलालेख रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील अलिबाग-चौल रस्त्यावरील आक्षी या गावात आहे. हा शिलालेख मराठी भाषेची शान असून त्यांमुळे आक्षी गावाला मोठा मान प्राप्त झाला आहे. रायगड जिल्हा परिषद आणि स्थानिक आक्षी ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून 2024 मध्ये मराठीतील या पहिल्या शिलालेखाचे जनत आणि संवर्धन करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख आणि मराठी भाषेचे गाढे अभ्यासक व संशोधक डॉ. शंकर गोपाळ तुळपुळे यांनी अलिबाग जवळील आक्षी गावांतील या शिलालेखाचा शोध लावून तो मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख असल्याचे सिद्ध केले. पुरातत्त्वज्ञ डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार तो मराठीतील पहिला शिलालेख आहे.

आक्षीचा शिलालेख मराठीतील आद्य शिलालेख असून त्यावर शके 934 म्हणजेच इ.स. 1012 असा स्पष्ट उल्लेख आहे. शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख असून त्याने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य दिल्याचा यात उल्लेख आहे. हा शिलालेख संस्कृत-मराठी अशा मिश्र देवनागरी लिपीतील असून नऊ ओळींचा आहे. त्या नऊ ओळींच्या वर चंद्र-सूर्य कोरले आहेत.

संस्कृत-मराठी मिश्र देवनागरी मधील शिलालेख मजकूर

गीं सुष संतु | स्वस्ति ओं | पसीमस-मुद्राधिपती | स्री कोंकणा चक्री-

वर्ती | स्री केसीदेवराय | महाप्रधा-न भईर्जू सेणुई तसीमीनी काले

प्रव्रतमने | सकु संवतु: 934 प्रधा-वी सवसरे: अधीकू दीवे सुक्रे बौ-

लु | भईजुवे तथा बोडणा तथा नऊ कुवली अधोर्यु प्रधानु | महलषु-

मीची वआण | लुनया कचली ज-

शिलालेखातील मजकूराचा अर्थ

जगी सुख नांदो. पश्चिम समुद्राधिपती श्री कोकणचक्रवर्ती, श्री केसीदेवराय याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याने शक संवत 934 प्रभव संवत्सर अधिक कृष्ण पक्ष शुक्रवार या दिवशी भइर्जूने देवीच्या बोडणासाठी नऊ कुवली धान्य नेमून दिले. लुनया कचली.

कोरीव ताम्रपट आणि शिलालेख मराठी भाषेच्या उगमाचे पूरावे

मराठी भाषेच्या उगम इतिहासातील सज्जड पुरावे म्हणजे कोरीव ताम्रपट आणि शिलालेख होत. त्या सर्वांवर काळाची नोंद नसली त्यांच्या अक्षरांच्या वळणावरुन त्या काळाची नोंद होऊ शकते. मराठी भाषेतील पहिला शिलालेख हा जैन दिगंबर पंथीय श्रवणबेळगोळ येथील बाहुबलीच्या पायथ्याशी असलेला शालिवाहन शके 1038-39 म्हणजेच इ.स. 1116-17 सालातील “श्री चावुण्ड राजे करवियले श्री गंगराजे सुत्ताले करवियले”अशा नोंदीचा मानला जात होता परंतु पुरातत्त्वज्ञ डॉ. शं.गो. तुळपुळे यांच्या संशोधनाप्रमाणे अक्षीचा शिलालेख हा पहिला शिलालेख ठराला आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात तीन लाख रुपयांची विशेष तरतूद करुन सन 2024मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अर्थ व बांधकाम सभापती ॲड. निलिमा प ाटील आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी पुढाकार घेवून, स्थानिक आक्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या मराठीतील पहिल्या शिलालेखाची सुव्यवस्थित उभारणी करुन परिसराचे सुशोभीकरण केले आहे. आज अनेक मराठीप्रेमी व पर्यटक आवर्जून येथे हा शिलालेख पाहाण्याकरिता येत असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT