बेकायदापणे भारतात राहणाऱ्या ३ बांगलादेशी महिलांवर कारवाई file
रायगड

बेकायदापणे भारतात राहणाऱ्या ३ बांगलादेशी महिलांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : नवी मुंबई गुन्हेशाखेच्या पोलिसांनी कळंबोलीत बेकायदापणे वास्तव्यास असलेल्या ३ बांग्लादेशी महिलांविरोधात कारवाई केली आहे. या प्रकरणात चमिली पप्पुहशमेर सिखडे, (३८ वर्ष), हमिदा शुकरीशौदत गाझी, (२७ वर्ष) व सलमा मोशियर शेख, (२९ वर्ष) अशी कारवाई केलेल्या बांग्लादेशी महिलांची नावे असून या सर्व महिला घरकाम करणाऱ्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी नागरीकांवर कारवाई करण्याचे आदेश अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षास दिले होते. त्यानुसार एएचटीयु पथकाच्या एपीआय अलका पाटील यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामा नामा भगत चाळ, सेक्टर ३, कंळबोली गाव येथे बांगलादेशी नागरीक बेकायदेशीरपणे वास्तव्यास असून ते सकाळी सहा ते साडे सात वाजेच्या दरम्यान कामावर निघून जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने, नमूद ठिकाणी पथकासह सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास सदरठिकाणी छापा टाकला. यावेळी सदर ठिकाणाहन ३ महिला मिळून आल्या. या महिलांकडे पथकास भारतीय नागरिकत्वाबाबत कोणताही पुरावा अगर कागद पत्रे मिळुन न आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, घुसखोरीच्या मागनि भारत बांगलादेश सिमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून व स्थानिक मुलकी अधिकाऱ्यांचे पूर्व परवानगीशिवाय व कोणत्याही वैध प्रवासी कागपत्रांशिवाय मागील दहा ते पंधरा वर्षापासून भारतात प्रवेश करून त्या राहत असल्याचे उघडकीस आले.

भारतीय नागरीक असल्याबाबत कोणताही पुरावा सादर करू शकल्या नसल्याने त्यांच्याविरोधात कंळबोली पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT