पनवेल : पनवेल शहरातील तक्का परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, या अर्भकासोबत इंग्रजीत लिहिलेली एक चिठ्ठीही सापडली आहे. या चिठ्ठीत बाळाच्या कुटुंबाने त्याला सांभाळण्याची असमर्थता व्यक्त केली आहे.
शनिवारी सकाळच्या सुमारास परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाचा मागोवा घेत असताना नागरिकांना त्या बास्केटमध्ये लपवलेले नवजात बाळ सापडले.
या घटनेची माहिती या परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले आणि बाळास उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.