महाड शहरात वृद्धेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कल्याणमधून अटक  Pudhari News Network
रायगड

महाड शहरात वृद्धेचे दागिने लंपास करणाऱ्या चोरट्याला कल्याणमधून अटक

महाड शहर पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

महाड : ६ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १.१० मिनिटांच्या सुमारास महाड शहरातील कुंभारआळी येथील सद्गुरू कृपा जनरल स्टोअर्स दुकानातील विजया चंदविलास शेठ या ६९ वर्षीय वृद्ध महिलेची मती गुंग करून तिच्या अंगावरील लाखोंच्या किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करून पळ काढलेल्या चोरट्याचा शोध लावण्यात नुकतेच महाड शहर पोलिसांना यश आले आहे.

खादिम हुसेन सय्यद असे या आरोपीचे नाव असून २७ जानेवारी २०२५ रोजी कल्याण येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी आंबिवली, इंदिरानगर, अर्चना पाटील चाळ, जिल्हा ठाणे येथील रहिवासी आहे. या आरोपीने याआधी देखील अन्य भागात

अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असल्याचा पोलिसांना संशय असून त्याला ताब्यात घेतल्यामुळे अजूनही काही चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सद्यस्थितीत या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिसांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच हा चोरीचा मुद्देमाल त्याच्या मूळ मालकाला परत केला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाड शहरातून दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. रायगड जिल्ह्यात चेन चोरीच्या घटना अधूनमधून घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT