मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 39 डेंजरस्पॉट pudhari photo
रायगड

Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर 39 डेंजरस्पॉट

कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खडतर

पुढारी वृत्तसेवा
रायगड : जयंत धुळप

गेल्या तब्बल 18 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रायगड जिल्ह्यातील पेण ते नडगाव-महाड या 95 किमी अंतराच्या टप्प्यातील अपूर्ण कामांमुळे एकूण 39 डेंजरस्पॉट शासकीय अहवालातून समोर आले आहेत. हे 39 डेंजरस्पॉट तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधीत अधिकारी आणि कंत्राटदार यांना दिले असले तरी ही कामे पूर्ण करण्याकरिता केवळ 49 दिवसांचा कालावधी हातात असून, या अत्यल्प कालावधीत ही 39 ठिकाणची कामे पूर्ण होणे केवळ अशक्य असल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि काही कंत्राटदार यांनी खासगीत बोलताना दिली आहे. परिणामी यंदा देखील कोकणात गणेशोत्सवाकरिता जाणार्‍या गणेशभक्तांना आपल्या घरी पोहोचण्याकरिता खडतर प्रवासालाच सोमारे जावे लागणार आहे.

गोवा महामार्गाच्या या 95 किमी अंतरातील या 39 डेंजरस्पॉटमंध्ये इंदापूर व माणगांव येथील काम सुरच न झालेले बायपास रोड, 4 अपूर्ण पूल, 12 सर्व्हीस रोड आणि 8 अपुर्ण अंडरपास या महत्वाच्या कामांचा समावेश आहे.

सर्व्हिस रोडवर मोठे मोठे खड्डे

पेण तालुक्यांत तरणखोप-पेण येथील खोपोली बाजुकडे जाणारा अंडरबायपास रोडचे काम अपुर्ण आहे. रामवाडी येथील अंडरबायपास रोडवर मोठे खड्डे पजल्याने तो अत्यंत धोकादायक झाला आहे.येथील रामवाडी आणि उचेडे येथील सर्व्हिस रोडचे काम अपुर्ण असुन येते धोकादाय परिस्थिती निर्माण झाली आहे.

गडब गावा जवळच्या अंडरबायपास ब्रिजचे वडखळ बाजुकडील भरावाचे काम अपूर्ण असून सर्व्हिस रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले असल्याने येथेही धोकादाय परिस्थिती निर्माण झाली आहे. कोलेटी गावाजवळ मुंबईकडे येणा-या वाहनांसाठी सर्व्हिस रोडचा रस्ता अर्धवट तयार असुन पुढे नाल्यावरील पुलाचे काम अपूर्ण आहे. तर दोन्ही लेनकडील वाहतुक ही एकाच मार्गाने जात असल्याने या मार्गावर मोठ मोठे खडे पडून धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. याच ठिकाणी डायव्हर्शन बाबतचे सुचनाफलक नसल्याने रात्री मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

नागोठणे टप्प्यात कामथ हॉटेल येथे अंडर बायपास ब्रिजचे काम अपूर्ण असल्याने सिंगल रोड असुन त्यावर देखील मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यातच या ठिकाणी डायव्हर्शन व सुचनात्मक बोर्ड लावलेले नसल्याने वाहन चालकांमध्ये नेमका रस्ता कोणता या बाबत संभ्रम निर्माण होवून अपघाताची शक्यता वाढलीआहे. कामथ हॉटेल समोरील अंडरबायपास पुलाचे काम झालेले नसल्याने येथे वाहतूक कोंडी सातत्याने होत असते.नागोठणे बायपास व रामनगर नागोठणे येथील रस्त्याची गंभीर आणि धोकादायक दुरवस्था झालेली आहे.

येथे मुंबई व गोवा या दोन्ही बाजुकडे जाणार्‍या वाहनांसाठी दोन्ही बाजुकडुन सर्व्हिस रोड केले आहेत मात्र त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच नागोठणे येथील अंडरबायपास ब्रिज वरील रोडचे काम अपूर्ण आहे. नागोठणे नाका रेल्वे ब्रिज एस.बी.आय बॅक येथील ब्रिजच्या बाजुच्या गोवाबाजुकडे जाणारा सर्व्हिस रोड अपुर्ण असून सिंगल रोड असल्याने तसेच त्यावरही मोठे खड्डे झालेले असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे.नागोठणे नाका रेल्वे ब्रिज एस.बी.आय. बॅक येथील अंडरबायपास पुलावरील रोडचे काम अपूर्ण आहे.

खांब गावाच्या हदद्दीत गोमांतक हॉटेल समोर मुंबई बाजुकडुन गोवा बाजुकडे जाणारे मार्गीकेवरील कालव्यावरील पुलाचे काम अपुर्ण आहे. तर या ठिकाणी सिंगल रोड असुन तोही रूंद असल्याने येथे वाहतूक कोडी सतत होत आहे.पुई गावातील म्हैसदरा पुलाचे मुंबई बाजुकडील लेन वरील काम अपूर्ण आहे.सिंगल रोड असल्याने एकाच मार्गाने वाहतुक सुरू असुन सर्व्हिस रोडवर पडलेले मोठे मोठे खड्डे मोठी समस्या बनले आहेत.

कोलाड नाका येथील रेल्वेब्रिज खालुन जाणारा व येणारा रोड स्वतंत्र नसल्याने येथे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे.मुंबई कडे येणारे सर्व्हिस रोडचे काम पूर्ण आहे तर सर्व्हिस रोडवर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत.तळवली कोलाड या ठिकाणी दोन्ही सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण आहे.तळवली कोलाड येथे अंडरबायपास ब्रिज वरील रोडचे काम अपुर्ण आहे.

इंदापुर येथील बायपास रोडचे काम सुरूच झालेले नसल्याने, इंदापुर बाजारपेठेतील अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. तर माणगाव येथील बायपास रोडचे काम देखील सुरूच झालेले नसल्याने माणगांव बाजारपेठेतुन जाणार्‍या अरुंद रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत आहे. श्रीवर्धन-म्हसळा बाजुकडुन मोर्बा रोडने येणा-या वाहनांकरीता पर्यायीमार्ग पवारवाडा येथुन एम.आर.एफ टायर मार्गे मुंबईकडे जाणा-या वाहनांसाठी आहे. परंतु या रोडचे काम सद्यस्थितीत बंद आहे. पर्यायी मार्गाबाबत सुचनात्मक बोर्ड बसवलेले नसल्याने ही परिस्थिती अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे.

लोणरे येथे अंडरबायपास ब्रिज वरील रोडचे काम अपुर्ण असल्याने दोन्ही बाजुकडील वाहतुक सर्व्हिस रोडने सुरू असल्याने तसेच दोन्ही सर्व्हिस रोडवर पडलेले मोठे मोठे खड्डे वाहतूक कोंडीचे कारण बनत आहेत. पुलावरील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. येणारे व जाणारे अशा दोन्ही सर्व्हिस रोडवर मोठे खड्डे पडलेले आहेत. महाड जवळ नडगांव येथे ओव्हरब्रिजचे काम अपूर्ण असल्याने येथे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे.

प्रत्यक्ष पहाणी करुन पूढील निर्णय - किशन जावळे, जिल्हाधिकारी,रायगड

यंदा गणेशागमन 27 ऑगस्ट रोजी असल्याने कोकणात जाणार्‍या वाहनांची सुरुवात 22 ऑगस्ट पासून सुरु होईल,त्यापूर्वी गोव्याच्या दिशेने जाणार्‍या महामार्गीकेचे काम पूर्ण करण्याचे निर्देश महामार्ग विभाग आणि संबंधीत कंत्राटदारांना दिले आहेत. खड्डांच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावून रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत. डायव्हर्शनच्या ठिकाणी बोर्ड लावण्यास सांगीतले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष पहाणी करुन पूढील निर्णय घेण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT