चिपळूण : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची रीघ लागली असून जिल्ह्यातील समुद्रकिनारे गर्दीने फुलून गेले आहेत. सर्व हॉटेल्स, लॉज हाऊसफुल्ल झाले असून कोकणात पर्यटकांची पाऊले वळली आहेत. थर्टी फर्स्ट एन्जॉय करण्यासाठी पर्यटकांनी कोकणला प्राधान्य दिले आहे.
दरवर्षी नाताळची सुट्टी असल्याने थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी कोकणातील समुद्रकिनार्यांकडे पर्यटकांची पाऊले वळतात. यावर्षी देखील पर्यटकांनी कोकणची निवड थर्टी फर्स्टसाठी केली आहे. मंडणगड तालुक्यातील वेळास, आंजर्ले, दापोली तालुक्यातील हर्णै, मुरूड, लाडघर, कर्दे, दाभोळ, गुहागर तालुक्यातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी, बुधल आदी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. विशेषकरून पश्चिम महाराष्ट्र, मुंबई येथील पर्यटकांनी येथील समुद्रकिनार्यावर मोठी गर्दी केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलला असून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या कारची वर्दळ आहे. आता नाताळची सुट्टी सुरू झाली आहे. या बरोबरच शनिवार, रविवार जोडून पुढे थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी पर्यटकांनी कोकण फुलले आहे. प्रत्येक समुद्रकिनार्यावर पर्यटकांनी गर्दी केली असून सनसेट पाहण्यासाठीही गर्दी होत आहे. या निमित्ताने या भागातील हॉटेल, लॉज फुल्ल झाले आहेत. काही हॉटेल्स व्यावसायिकांनी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पार्टीदेखील अरेंज केल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनादेखील सुरू केल्या आहेत. विशेषकरून मुंबई, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर येथील पर्यटकांनी उत्तर रत्नागिरीतील समुद्रकिनार्यांना मोठी पसंती दिली आहे. स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारे, गुलाबी थंडीचा गारवा त्या बरोबरच मास्यांची फक्कड चव घेत पर्यटक येथे आस्वाद घेत आहेत. कोकणी जेवणावर देखील अनेक ठिकाणी ताव मारला जात आहे.
थर्टी फर्स्टच्या निमित्ताने अनेकजण गोव्याला पसंती देतात. मात्र, अलिकडच्या काही वर्षांत कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनार्यांकडे पर्यटकांची पाऊले वळत आहेत. विशेषकरून या ठिकाणी मिळणारे मासे आणि स्वच्छ-सुंदर किनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. यामुळे मास्यांचा भाव वधारला आहे. स्थानिक बाजारपेठेत अनेक प्रकारचे मासे सध्या उपलब्ध होत नाहीत. मात्र, पर्यटकांसाठी अनेक हॉटेल्समध्ये हे मासे उपलब्ध होत आहेत. या शिवाय गोव्यातील उद्योजकांनी या जिल्ह्यात मिळणारे मासे चढ्या दराने आधीपासूनच नेले आहेत. त्यामुळे मास्यांचा भाव वधारला आहे.