महाड : पुढारी वृत्तसेवा
महाबळेश्वर येथून पर्यटनासाठी महाड तालुक्यातील सव गरम पाण्याचे कुंड येथे आलेल्या दिलावर शहाबुद्दीन नालबंद मुनावर, शहाबुद्दीन नालबंद व जाहीद जाकीर पटेल हे तीन जणांचा सव नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या दुर्घटनेबद्दल परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
या संदर्भात संबंधितांकडून स्थानिक प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहिम सुरू केली. महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांनी यासंदर्भात संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार स्थानिक रेस्क्यू टीमकडून करण्यात आलेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे या तिन्ही मृत इसमांचे मृतदेह घटनास्थळाजवळ पाण्यातून बाहेर काढण्यात जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर यश आले. मृतदेहांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या संदर्भात संबंधित पर्यटकांच्या नातलगांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज (रविवार) दुपारी ही तीन कुटुंबे महाबळेश्वर येथून महाड तालुक्यातील खाडीपट्टा येथे असलेल्या सव गरम पाण्याच्या कुंडामध्ये पोहण्यासाठी आली होती. त्यानंतर नदीपात्रात जाण्याचा त्यांचा निर्णय झाला असे सांगण्यात आले, मात्र पाण्यात एकजण बुडताना त्याला वाचवताना दुसऱ्याने त्यानंतर एकापाठोपाठ तीसऱ्यानेही पाण्यात उडी घेतल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
केवळ एक ते दीड तासांमध्ये घटना घडल्यानंतर स्थानिक रेस्क्यू टीमकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. अशा तातडीच्या रेस्क्यू टीम संदर्भात शासनाने कायमस्वरूपी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांची सुव्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे. या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही केल्यानंतर मृतदेह संबंधितांच्या ताब्यात देण्यात येतील असे प्रशासनाने स्पष्ट केले. या दुर्घटनेबद्दल परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.