पुणे

१५ टक्के फी कपातीबाबत शाळांची मनमानी, विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखून

अमृता चौगुले

वर्षा कांबळे: 

पिंपरी : शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने सर्व माध्यमांच्या खासगी शाळांना 15 टक्के फी कपात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही शाळांनी पालकांकडून पूर्ण फी वसूल करून पुढील वर्षात सवलत देऊ, असे सांगितले. ज्या पालकांनी पूर्ण फी भरली नाही, अशा पालकांच्या पाल्यांचे निकाल अडवून ठेवण्याचा प्रकारही शाळांनी केला आहे. तसेच पूर्ण फी भरलेल्या पालकांकडून या शैक्षणिक वर्षाचा पहिला हफ्ता देखील घेतला आहे.

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना शहरातील काही खासगी शाळांकडून पालकांना शंभर टक्के फीसाठी तगादा लावला जात आहे. यासाठी शाळेतील पालकांनी मोर्चे आणि आंदोलने करुन 50 टक्के फी कपातीची मागणी केली होती. अशा परिस्थितीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांनी शैक्षणिक वर्ष 2020 – 21 मध्ये पालकांना फीमध्ये 15 टक्के सवलत द्यावी, असे परिपत्रक काढले होते.

त्यानंतरही शाळांनी आम्हाला परिपत्रक मिळाले नसल्याचे सांगून पालकांकडून फी वसूल केली. काही शाळांनी पालकांना विश्वासात घेवून यावर्षी पूर्ण फी भरा, तुम्हाला पुढील वर्षी पंधरा टक्के फी कपात करू, असे सांगून पूर्ण फी आकारली आहे. पण या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणार्‍या पालकांकडून फीचा पहिला हफ्ता भरल्याशिवाय प्रवेश दिला नाही. तर ज्यांनी फी भरली नाही त्या पालकांना पाल्याचे निकाल हातात दिले नाहीत. तर निकालाचे फोटो काढण्यास सांगितले.

यावर्षी शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी पुन्हा एकदा पूर्ण शुल्कासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे देखील पालकांच्या शाळांविरोधात 52 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या शैक्षणिक वर्षापासून शाळा ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे पालकांना पूर्ण फी भरावी लागणार आहे. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षातील फीमध्ये शासनाच्या जीआरनुसार 15 टक्के सलवत मिळावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

शासनाचा जीआर वेबसाईटला अपलोड केला आहे. त्यामुळे शाळांना तो वेगळा पाठवायची गरज नाही. शाळांनी शासनाचा जीआर पाहणे गरजेचे आहे. शाळांनी अजूनही पंधरा टक्के फी कपात केलीच नाही.
                                                                      – जयश्री देशपांडे,
                                                        संस्थापक, पॅरेन्टस असोसिएशन पुणे

शाळेने आम्हाला गेल्या वर्षी 15 टक्के फी कपात असताना देखील यावर्षी पूर्ण फी भरा, तुम्हाला पुढील वर्षी फीमध्ये सवलत देवू, असे सांगितले. मात्र, आता शाळा सुरू होतील, तोवर आमच्याकडून यावर्षीचा फीचा पहिला हफ्ता देखील वसूल केला आहे. तर ज्यांनी पूर्ण फी भरली नाही अशा पाल्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.
                                                                 – प्रमोद पाटील, पालक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT