मंचर : पुढारी वृत्तसेवा: फंडामध्ये नंबर लावतो असे म्हणत मंचर (ता. आंबेगाव) येथील हॉटेल व्यावसायिक गुलाब मारुती निघोट यांच्याकडून वेळोवेळी एक लाख दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सूर्यकांत उर्फ बाळू पांडुरंग भोर (रा. भोरवाडी, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) याच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गुलाब निघोट यांचे मार्केट यार्डमध्ये हॉटेल आहे. निघोट यांना त्यांच्या ओळखीच्या सूर्यकांत भोर याने दि. 5 जुलै 2021 रोजी तुमचा फंडामध्ये नंबर लावतो असे सांगितले. निघोट यांनी भोरच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फंडामध्ये पैसे भरणा चालू केला.
भोरने त्यांना एक लाख रुपये द्या असे सांगितले. निघोट यांनी एवढी रक्कम नसल्याचे सांगितले. तेव्हा भोरने फंडाच्या सिक्युरिटीसाठी दोन कोरे चेक द्या असे सांगितले. निघोट यांनी दि. 14 जुलै 2021 रोजी त्यांचा मित्र समर्थ कालिदास सरोदे (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) याच्या खात्यावरून सूर्यकांत उर्फ बाळू पांडुरंग भोर याच्या खात्यावर वेळोवेळी व रोख स्वरूपात एकूण एक लाख दहा हजार रुपये दिले. तसेच सही केलेले दोन कोरे चेक दिले. निघोट यांनी भोरकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली असता भोर याने चेक दिले. सदर चेक फिर्यादी यांनी बँकेत भरले असता ते वटले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निघोट यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तपास पोलिस जवान घोडे करीत आहेत.
हेही वाचा