पुणे

हे पुणे आहे की बँकॉक…? पहाटे पाचपर्यंत पबमध्ये मद्याचा पूर आणि डीजेचा दणदणाट

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील कल्याणीनगर, कोरेगाव पार्क, मुंढवा परिसरातील पब, हॉटेल्स नियमांना तिलांजली देत पहाटे पाच-सहापर्यंत आपला छैंय्या..छैय्याचा खेळ रंगवत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने परवा केलेल्या कारवाईत हे वास्तव समोर आले आहे. रात्रभर सुरू असलेल्या डीजेचा दणदणाट, मद्याचा प्याला रिचवत बेधुंद होऊन पहाटे चार वाजेपर्यंत नशेत थिरकरणारी तरुणाई आणि गोंगाटाने त्रस्त स्थानिक नागरिक हे 'पुणे आहे की बँकॉक' असा सवाल विचारत आहेत.

शहरातील इतर हॉटेल बंद झाल्यानंतर कोरेगाव पार्कातील एका हॉटेलमध्ये तर पहाटे सहापर्यंत पार्ट्या रंगतात. अनेकदा तक्रारीकरून देखील या हॉटेलवर कारवाईहोताना दिसून येत नाही. एखादी तक्रार करायची म्हटलं, तर स्थानिक गुंडांकडून धमकावले जाते. त्यामुळे रात्र 'मद्यधुंदीत जागवा' लक्ष्मी दर्शनाच्या नादात 'यहाँ सबकुछ ऑल राईट चल रहा है भाई…' असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. शहरात नियमानुसार पहाटे एक वाजेपर्यंत पब आणि हॉटेलला परवानगी आहे. या वेळात निर्धारित केलेल्या आवाज मर्यादेनुसार डीजे वाजवण्याचे त्यांच्यावर बंधन आहे.

मात्र, असे असतानादेखील स्थानिक प्रशासनासोबत हातमिळवणी करून त्यांना आर्थिक मलिदा चारून हे व्यावसायिक नियम पायदळी तुडवण्याचे गणित जमवून आपल्या आर्थिक तुंबड्या भरतात. साहजिकच त्यातील मोठ्या वाट्याने अनेकांचे हात ओले होत असल्यामुळे 'तेरी भी चुप और मेरी भी चुप' असे सगळे सुरू आहे. शिवाय, स्थानिक गुंडदेखील हे पब, हॉटेल व्यावसायिक आपल्या दिमतीला ठेवतात.

गेल्या काही दिवसांपूर्वी येरवडा परिसरातील एका पबमध्ये जेवणाच्या कारणातून वकिलाच्या डोक्याला पिस्तूल लावल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे अशा मुजोर आणि मस्तवाल पब चालकांना नेमकं अभय कोणाचे आहे? असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक विभागाने केलेल्या कारवाईतदेखील मुंढवा परिसरातील अनेक हॉटेल नियमांना तिलांजली देत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यानंतरदेखील असे शहरात विविध भागांत सुरूच असल्याचे दिसते.

…असे प्रकार सर्रास
रात्रीच्या वेळी मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजात डीजे लावला जातो. पहाटे पाचपर्यंत विनापरवाना मद्यविक्री होते. अठरा वर्षांखालील तरुण-तरुणींना केवळ भरगच्च एन्ट्री चार्जेस घेऊन पबमध्ये प्रवेश दिला जातो. इंटरनॅशनल कलाकारांचे कार्यक्रम करत पहाटेपर्यंत डीजेच्या दणदणाटात मद्यधुंद रात्र जागविली जाते. त्यामुळे स्थानिकांवर 'कोणी घर घेता का घर…' असे म्हणण्याची वेळी आली आहे.

'युनिकॉर्न','एलरो'ला टाळे
कल्याणीनगरसारख्या उच्चभ्रू परिसरातील नामांकित हॉटेल 'युनिकॉर्न' आणि 'एलरो पब'वर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून, मद्यविक्री परवाना स्थगित केला आहे. 'ड्राय डे' असताना मद्यविक्री सुरू ठेवण्यासह परवाना देताना घालून दिलेल्या अनेक तरतुदींचे उल्लंघन झाल्याने या दोन्ही बड्या हॉटेल, पबला टाळे ठोकण्यात आले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी (दि. 31) शहरात जिल्हाधिकार्‍यांकडून ड्राय डे घोषित करण्यात आला होता. तरीही या दोन्ही ठिकाणी मद्यविक्रीबरोबरच डीजेच्या गोंगाटात धांगडधिंगा पहाटे साडेतीन वाजेपर्यंत सुरू होता. तक्रार प्राप्त होताच उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. तेथील प्रकार निदर्शनास येताच दोन्ही हॉटेल्सचा मद्यविक्री परवाना तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले असून, 13 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सुनावणी ठेवली आहे.

दोन्ही हॉटेलचा परवाना स्थगित करण्यात आला आहे. अशाच प्रकारची कारवाई इतर हॉटेल, पबवरदेखील होऊ शकते. म्हणून हॉटेलचालकांनी नियमांचे पालन करावे, असा प्रकार जर कोणाच्या निदर्शनास आला, तर त्यांनी आमच्याकडे कळविले, तर आमचे पथक तातडीने कारवाई करेल.
  – चरणसिंह राजपूत                                                                                अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, पुणे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT