पुणे

हिंजवडी-कासारसाई गट महिला राखीव

अमृता चौगुले

हिंजवडी : पंचायत समिती निवडणुकीसाठी माण-पौड जिल्हा परिषद गट खुला झाला आहे. त्यामुळे या गटातील उमेदवारांमध्ये अधिक चुरस असणार आहे. तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटांपैकी हा एकमेव गट सर्वसाधन खुला आहे. उर्वरित तिन्ही गट महिला व ओबीसी महिलांसाठीच राखीव आहेत. मुळशी पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत गुरुवारी येथील सेनापती बापट सभागृहात पार पडली. सर्व तालुक्यातील इच्छुकांचे लक्ष या आरक्षण सोडतीकडे लागले होते. यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले होते. यासाठी नव्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणानुसार आरक्षण सोडत घेतली गेली. यानुसार एकूण जागांच्या 50 टक्के महिला आरक्षण तसेच, 27 टक्के नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले होते. परंतु, तालुक्यात अपेक्षित लोकसंख्या नसल्यामुळे 12 टक्के आरक्षण देण्यात आले.

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पुणे येथे सोडत घेण्यात आली. माण गणातदेखील सर्वसाधारण पुरुषसाठी खुला असणार आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. यासह हिंजवडी-कासारसाई गटात सर्वसाधारण महिला आरक्षण देण्यात आले आहे. या गटातदेखील अनेक मात्तबरांनी खुल्या वर्गासाठी देव पाण्यात ठेवले होते. हिंजवडी व कासारसाई दोन्ही गण सर्वसाधारण पुरुष असणार आहेत. या सोडतीमध्ये पिरंगुट-भूगाव गटातील इच्छुकांवर काहीसा अन्याय झाल्याची चर्चा आहे.

येथील जि. प. गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. यामुळे अनेक मातब्बरांची निराशा झाली. यासह भूगाव गण अनुसूचित जाती महिला, तर पिरंगुट गणदेखील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. या जि. प. गटातील तिन्ही जागा महिलांसाठी राखीव असल्याने इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. माले-कोळवण जिल्हा परिषद ओबीसी महिला राखीव आहे. येथे ग्रामीण असलेल्या या गटातदेखील अनेक आजी-माजी पदाधिकार्‍यांच्या सौभाग्यवती निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. यानुसार लोकसंख्येच्या आधारे पंचायत समितीच्या आधारे भूगाव पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिलासाठी प्रथम राखीव करण्यात आले. यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी पिरंगुट गणाचे आरक्षण सोडत करण्यात आली.

माले तसेच कासाअंबोली गटातदेखील सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. तालुक्यातील हिंजवडी, माण, कासारसाई, कोळवण गण सर्वसाधारण पुरुषांसाठी खुला असणार आहे. यामुळे आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणनीतीस खर्‍या अर्थाने सुरुवात झाली आहे.

गणात चुरस राहणार
पुणे शहरालगत असलेल्या भूगाव गणातदेखील अनेक इच्छुकांना आता थांबावे लागणार आहे. तर, तालुक्याच्या उत्तर भागातील हिंजवडी, माण, कोळवण, कासारसाई गणातील इच्छुकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः हिंजवडी-कासारसाई जिल्हा परिषदेतील दोन्ही गण खुले असल्याने दोन्ही पंचायत समिती गणात चुरस राहणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT