कै. कॅप्टन शिवरामपंत दामले प्रशालेत ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत सुमारे 1000 विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाच्या रंगातील छत्र्यांच्या साहाय्याने राष्ट्रध्वजाची प्रतिमा तयार केली. (छाया : यशवंत कांबळे)  
पुणे

‘हर घर तिरंगा’चा जोश, पुणेकर जागोजागी फडकवताहेत राष्ट्रध्वज; सोशल मीडियावरही माहोल

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहरातील विविध संस्था-संघटनांसह शासकीय कार्यालयांकडून विविध उपक्रमांचे आयोजन करून भारताचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येत आहे. विशेषतः 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत राष्ट्रध्वजाचे वाटप, मॅरेथॉन, दौड, प्रदर्शनांचे आयोजन केले जात आहे. त्याचबरोबर पुणेकरांचाही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग असून, जागोजागी ते तिरंगा फडकविताना दिसत आहेत. मुलांसोबत बाल्कनीत राष्ट्रध्वज लावणारे आई-वडील… सोसायटीच्या प्रवेशद्वारावर तिरंगा ध्वज लावणारे कार्यकर्ते… अशा वातावरणात 'हर घर तिरंगा' उपक्रमाचा जोश अन् जल्लोष शहरात पाहायला मिळत आहे.

सदाशिव पेठ असो वा डेक्कन परिसर… नवी पेठ असो वा सहकारनगर… सर्व ठिकाणच्या सोसायटी, दुकाने, घरे अन् गल्ल्यांमध्ये तिरंगा राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. घरोघरी तिंरगा ध्वज नजरेस पडत आहे. नागरिकांमध्ये आनंद, उत्साह दिसून येत असून, सोसायट्यांमध्ये देशभक्तीपर गीतांनी वेगळाच माहोल निर्माण केला आहे. देशाचा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे सगळीकडे देशभक्तीचे वातावरण रंगले आहे.

नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरांसह दुकानाच्या, कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावला असून, सोसायट्यांच्या प्रत्येक फ्लॅटच्या बाल्कनीत राष्ट्रध्वज नजरेस पडत आहे. शनिवार पेठ, नवी पेठ, सदाशिव पेठ, डेक्कन परिसर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, शिवाजीनगर, बोपोडी, अशा विविध ठिकाणी घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये अन् कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज लावण्यात आला आहे. सोबतीला देशभक्तीपर गीते अन् 'भारत माता की जय' अशा विविध घोषणा देणारी तरुणाई पाहायला मिळत आहेच.

पण, त्याशिवाय दुचाकी आणि चारचाकीवरही राष्ट्रध्वज लावणारे नागरिक शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहेत. जिथे नजर पडेल तिथे राष्ट्रध्वज दिसत असून, प्रत्येकाने या उपक्रमात हिरिरीने सहभाग नोंदवला आहे. देशभक्ती अन् देशाभिमान प्रत्येकात पाहायला मिळत आहे. सोसायट्यांमध्ये तर लोकांनी शनिवारपासूनच (दि. 13) राष्ट्रध्वज लावले आहेत, तर काही वस्तींमधील घरांमध्येही राष्ट्रध्वज फडकल्याचे दिसत आहे. सगळीकडे आनंदी अन् देशभक्तीचे वातावरण दिसत असून, सोशल मीडियावरही या उपक्रमाचा उत्साह आहे.

अनेकांनी राष्ट्रध्वजाचा डीपी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर लावला आहे. तर काहीजण खास छायाचित्रे, व्हिडीओ आणि संदेशाद्वारे या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. तसेच, काही तरुणांनी खास व्हिडीओही तयार केले आहेत. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोसायटी असो वा घरे… दुकाने असो वा स्टॉल्स… सर्व ठिकाणी तिरंगाच तिरंगा दिसत आहे. तर सोशल मीडियावरही हाच रंग बहरला आहे.

'झेंड्याची माहिती आवश्यक'
'तिरंगी झेंड्याची माहिती आणि महत्त्व प्रत्येक विद्यार्थ्याला कळणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन आचार्य विनोबा लोकसेवक संघाचे संस्थापक अध्यक्ष दीपक निकम यांनी केले. वाघोली येथील प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेत आचार्य विनोबा लोकसेवक संघातर्फे भारतीय अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'घर घर तिरंगा'निमित्त विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते. 22 जुलै 1939 रोजी ध्वज समितीची स्थापना झाली. 22 जुलै 1947 रोजी संविधान समितीने मान्यता दिली व आपला भारतीय तिरंगा अधिकृतपणे अस्तित्वात आला. झेंड्याचा आकार 3 बाय 2 असतो, अशी माहिती निकम यांनी दिली.

दत्त मंदिरावर ध्वजारोहण
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार, ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड. रजनी उकरंडे, सुनील रुकारी, युवराज गाडवे, राजू बलकवडे, अक्षय हलवाई उपस्थित होते. या वेळी 97 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक श्यामल गुप्ते, शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या वीरमाता गीता, शहीद जवान विजय मोरे यांच्या वीरपत्नी दीपाली यांचा सन्मान करण्यात आला.

महापालिकेवर रोषणाई
महापालिका भवनवर करण्यात आलेल्या विद्युतरोषणाईचे उद्घाटन खा. गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी बापट यांनी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये असणारे पूर्वीचे खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, राजेश पांडे आदी उपस्थित होते. बापट म्हणाले, पुण्यातील वातावरण चांगले राहावे, यासाठी पुण्याचा खासदार म्हणून मी या कार्यक्रमाला सर्वांना बोलावले.'

केशवनगरमध्ये आज 'मिनी मॅरेथॉन'
व्यंकटेश ग्राफिटी सहकारी गृहरचना सोसायटी, केशवनगरतर्फे रविवारी (दि. 14 ) 'मिनी मॅरेथॉन'चे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतीत सुमारे 300 हून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत, अशी माहिती आयोजक सतीश पाटील, रणजित लोणकर आणि सतीश देसाई यांनी दिली. केशवनगर येथील मुख्य रस्त्यापासून रेणुकामाता मंदिर रस्त्यावरील रेणुकामाता मंदिर ते व्यंकटेश सोसायटी असे दोन किमी अंतर पार केल्यानंतर शर्यतीचा अंतिम टप्पा पूर्ण होणार आहे. मिनी मॅरेथॉनमध्ये 5 वर्षांपासून वेगवेगळ्या वयोगटांतील खेळाडू सहभागी होत आहेत. 10 वर्षांखालील गट, 25 वर्षांखालील गट आणि वरिष्ठ गट, अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे.

'बजाज'कडून पालिकेला 5 लाख ध्वज
बजाज ग्रुपकडून महापालिकेस 5 लाख तिरंगा ध्वज देण्यात आले. महापालिकेत झालेल्या कार्यक्रमात बजाज ग्रुपच्या शेफाली बजाज यांच्या हस्ते महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांच्याकडे 5 लाख तिरंगा ध्वज सुपूर्त करण्यात आले. अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र बिनवडे, विलास कानडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्यासह सर्व खातेप्रमुख, कर्मचारी आणि बजाज ग्रुपचे अजय साठे आणि इतर सदस्य, अधिकारी उपस्थित होते. 'आमचा समूह भारताच्या भावी पिढ्यांना पाठबळ देण्यासाठी कार्यरत असून त्यांच्या सीएसआर कार्यक्रमामार्फत बालक आणि तरुणाईवर विशेष लक्ष देण्यात आले आहे,' असे साठे यांनी या वेळी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT