पुणे

‘स्पेशल छब्बीस’चा मास्टरमाइंड ‘पोलिस’च; नाशिक, ठाण्यातून पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अँटी करप्शनचे पोलिस असल्याचे सांगून पुण्यातील नगररचना उपसंचालकाच्या घरात स्पेशल छब्बीसचा डाव टाकणार्‍या तिघांना वारजे पोलिसांनी ठाणे आणि नाशिक येथून अटक केली. यामध्ये नाशिक शहर पोलिस दलातील एका कर्मचार्‍याचादेखील समावेश आहे. गणेश संतोष पाटील (वय 41), जयश्री गणेश पाटील (वय 37, रा. दोघे इंद्रानगर, नाशिक), हर्षल श्रीकांत घाग (वय 34, रा. शिवाईनगर, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गणेश आणि जयश्री हे दोघे पती-पत्नी आहेत.

गणेश हा नाशिक शहर पोलिस दलात कार्यरत आहे, त्याने पूर्वी सहा वर्षे मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात काम केल्याची माहिती आहे. त्या दोघांना नाशिक येथून, तर घाग याला ठाण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.24) भल्या सकाळी, तिघेजण आम्ही अँटी करप्शनचे पोलिस आहोत, असे सांगून नगर रचना उपसंचालकाच्या घरात शिरले. त्यांचे मोबाईल काढून घेऊन कारवाईचा बहाणा केला. मात्र, याची माहिती उपसंचालकाच्या मुलाने सकाळी गस्तीवर असलेल्या वारजे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिस अधिकारी तेथे गेले होते. त्यावेळी गस्तीवरील महिला पोलिस उपनिरीक्षकांना आम्हाला कल्पना न देता कसे आलात, असे म्हणत वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करण्याचा बहाणा करून या तोतयाने पळ काढला होता.

अशा ठोकल्या बेड्या
तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. त्यावेळी तिघे एका स्कोडा गाडीतून आल्याचे दिसले. संचालकांच्या घरी येण्यापूर्वी गाडी आंबेडकर चौकात फिरली होती. तेथे गाडीचा नंबर पोलिसांना मिळाला. ती गाडी हर्षल घाग याच्या नावावर असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी घाग याला ठाण्यातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत पोलिस कर्मचारी गणेश आणि त्याची पत्नी जयश्री या दोघांची नावे समोर आली. वरिष्ठ पोलिस शंकर खटके, दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, नरेंद्र मुंढे, कर्मचारी अमोल राऊत, रवी गाडे, हनुमंत मासाळ, महिला कर्मचारी कोंडे यांच्या पथकाने पाच दिवसांत आरोपींना बेड्या ठोकल्या.

अशी सूचली कल्पना..
आरोपी पोलिस कर्मचारी गणेश पाटील याने बातम्यांच्या माध्यमातून पुण्यात एका नगर रचना सहसंचालकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची झालेली कारवाई पाहिली होती. तसेच फिर्यादीबाबतदेखील माहिती जमा केली होती. त्यांचा शांत, संयमी स्वभावाची माहिती मिळाल्यामुळे ते जाळ्यात अडकतील, असे त्याला वाटले होते. तसेच तोतया पोलिसांच्या प्रकाराची देखील त्याला माहिती होती. त्यातूनच त्याने स्पेशल छब्बीसचा डाव टाकण्याची योजना आखली.

SCROLL FOR NEXT