ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : ताथवडे परिसरातून पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणार्या पुनावळे पुलाजवळील सेवारस्त्यावर पावसामुळे खड्डे पडून त्यामध्ये पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे परिसरास तळ्याचे स्वरूप आले होते. याविषयी 'पुढारी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची स्थानिक रहिवाशांनी दखल घेत स्वखर्चातून खड्ड्यांमध्ये मुरूम टाकून रस्त्याची डागडुजी केली. या सेवारस्त्यावरून ये-जा करताना स्थानिकांना अडचणीचा सामना करावा लागत असे; तसेच रात्रीच्यावेळी या खड्याचा अंदाज न आल्याने वाहन चालकांना किरकोळ अपघातासही सामोरे जावे लाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
याविषयी वेळोवेळी पालिकेकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने पुनावळेतील स्थानिकांनी स्वखर्चातून येथील रस्त्यावर साचलेले पाणी, खड्डे जेसीबीच्या सहाय्याने मुरूम टाकून बुजवले. त्यामुळे परिससरातील रहिवाशांना तसेच वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुनावळे गाव महामार्गालगत असल्याने येथील सेवा रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते.पावसामुळे येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे येथे वाहन चालकांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत होते. येथील नागरिकांची समस्या जाणून घेत आम्ही स्वखर्चातून येथील रस्त्यावरील खड्डे बुजवले जेणेकरून येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, असे स्थानिक रहिवासी चेतन भुजबळ यांनी सांगितले.