पुणे

स्थानक उडवण्याची धमकी देणारा जेरबंद; गुगल व्हॉइस सर्चद्वारे मिळवला पोलिसांचा नंबर

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार्‍याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. प्रभू कृष्णा सूर्यवंशी (वय 22, रा. सध्या सीएसटी फिरस्ता, मूळ हाडसनी, ता. हदगाव, जि. नांदेड) असे त्याचे नाव आहे. प्रभू निरक्षर असून, त्याने गुगल व्हॉइस सर्चवरून पुणे पोलिस नियंत्रण कक्षाचा नंबर शोधून त्यानंतर फोन करून धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. सूर्यवंशीने यापूर्वी अशाच प्रकारे वरिष्ठ उच्चपदस्थ राजकीय नेते, मोठे उद्योगपती यांना कॉल केले होते. त्याच्याविरुद्ध गावदेवी पोलिस ठाणे व वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सूर्यवंशी निरक्षर आहे. त्याने काही दिवसांपूर्वी चोरलेल्या मोबाईलचा वापर करून हा कॉल केला होता. हा फोन रेल तिकीट शाम या नावाने रजिस्टर होता. लोहमार्ग पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, अंमलदार धीरज भोसले, रूपेश पवार, संदीप काटे, दिलीप खोत यांनी त्याचा शोध घेऊन मुंबईतील डोंगरी भागातून त्याला पकडले. 'या कॉलमध्ये कोणतीही दहशतवादी संघटना अथवा सामाजिक अराजकता माजवणारे घटक नाहीत. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्याने हे कृत्य केले असून, यापूर्वीही त्याने असे कृत्य केल्याचे सांगत आहे,' असे लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT