पुणे : संतोष जाधवला फॉलो करणार्या 100 पेक्षा अधिक तरुणांच्या खात्याची यादी पुणे ग्रामीण पोलिसांनी काढली असून, त्यांच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान येथील गुन्हेगारी टोळ्यांचे सोशल मीडियावर मोठे फॉलोअर आहेत. या टोळ्या सोशल मीडियाचा मोठा वापर करताना दिसून येतात. संतोष जाधव याचेसुद्धा सोशल मीडियावर मोठे फॉलोअर असल्याचे पोलिसांना दिसून आले आहे.
अल्पवयीन तरुणांना चांगले-वाईट समजत नसल्याने गुन्हेगारांच्या स्टाईलला भुलून ते त्यांच्याकडे आकर्षित होतात. कालांतराने त्यांना फॉलो करायला लागतात. त्यामुळे पोलिसांनी अशा युवकांची यादी तयार केली असून, त्यांच्याबरोबरच त्यांच्या पालकांचेही समुपदेशन करणार असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले.
संतोष जाधव आणि त्याच्या बिष्णोई टोळीचे सोशल मीडियावर अनेक फॉलोअर्स आहेत. त्याच्याप्रमाणे वेशभूषा करणे व त्याचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर टाकणे, त्याचा डीपी ठेवणे, असे प्रकार या भागात सुरू आहेत. या प्रकरणाचा शोध घेत असताना सोशल मीडियावर अशी किमान 100 हून अधिक अकाउंट्स पोलिसांना सापडली. त्यांच्याकडून गुंडांचे उदात्तीकरण केले जात आहे. त्यातून नकळत हे युवक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे तरुण आणि त्यांच्या पालकांना हे धोके पोलिस समजावून सांगणार आहेत.
बिष्णोई टोळी देशात सक्रिय आहे. सातशेपेक्षा अधिक सदस्य या टोळीत कार्यरत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही टोळी एकमेकांसोबत संपर्क ठेवते. संतोष जाधव आणि सौरभ महांकाळ ऊर्फ सिद्धेश कांबळे या दोघांमुळे थेट पुण्यापर्यंत टोळीचे धागेदोरे पोहचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी या टोळीचे राज्यातील पाळेमुळे शोधून काढण्यास सुरुवात केली आहे.
बिष्णोई टोळी छोट्या-मोठ्या गुन्ह्यांत अडकलेल्या तरुणांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करते. पोलिस ज्यांच्या शोधात आहेत, त्यांची माहिती मिळवून त्यांना मदत करण्याचा, पोलिसांपासून वाचविण्यासाठी आश्रय देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्यांना आपल्या टोळीत सामील करून घेऊन त्यांच्याकडून मोठे गुन्हे करवून घेते.
मुसेवाला हत्येत जाधव आणि सौरभ महांकाळ या दोघा संशयितांची नावे समोर आल्यानंतर पंजाब, राजस्थान आणि हरियाणा पोलिसांनी पुण्यात येऊन दोघांची चौकशी केली आहे. तसेच मुंबई पोलिसदेखील सलमान खान धमकी प्रकरणाची चौकशी करीत आहेत. राजस्थान आणि हरियाणा येथील गुन्ह्यांत त्यांचा सहभाग आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा