पुणे

सोमेश्वरनगर : रोडरोमिओंच्या महाविद्यालय परिसरात घिरट्या; बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वरनगर परिसरात रोडरोमिओंची संख्या वाढली आहे. शाळा व महाविद्यालय परिसरात असे रोडरोमिओ विनाकारण घिरट्या घालत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालक करत आहेत. सोमेश्वर परिसराची शैक्षणिक हब म्हणून ओळख होत आहे. परिसरात जवळपास दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फलटण, खंडाळा, पुरंदर, बारामती आदी तालुक्यातील विविध गावातून विद्यार्थी शिक्षणासाठी सोमेश्वर येथे ये-जा करतात.

मात्र शाळा आणि महाविद्यालये सुटल्यानंतर रस्त्यावर, महाविद्यालयाच्या गेटसमोर, तर कधी थेट विद्यालयातच हे रोडरोमिओ आपल्या दुचाकीवरून विनाकारण चकरा मारत असतात. मुलांकडून प्रसंगी हातवारे, इशारे करून विद्यार्थिनींना नाहक त्रास देण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. वडगाव निंबाळकरअंतर्गत येणार्‍या करंजेपूल पोलिस चौकीतील कर्मचार्‍यांचा धाक नसल्याने या प्रकारात वाढ झाली असल्याचा आरोप पालक करत आहेत. दरम्यान या संवेदनशील प्रश्नाकडे शिक्षकांनीही लक्ष देण्याची गरज आहे.

विद्यार्थी घेतात पोलिसांचा गैरफायदा
पोलिसांनी गांभीर्याने या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे; अन्यथा चुकीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पोलिस त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी पोलिसांचा गैरफायदा घेत आहेत. पोलिसांनी याबाबतीत पालकांनाही समज देण्याची गरज आहे.

महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र जवळ बाळगावे. पालकांनीही आपल्या मुलांना समज देत दुचाकी वापरण्यावर बंधन घालावी. यापुढील काळात शाळा- महाविद्यालय परिसरात विनाकारण फिरणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
 

                                                                        – योगेश शेलार,
                                                पोलिस उपनिरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलिस.

SCROLL FOR NEXT