पुणे

सीमा रक्षणासाठी लवकरच मानवरहित जिप्सी !

अमृता चौगुले

दिनेश गुप्ता

पुणे : देशाच्या सीमेवर संरक्षणासाठी लवकरच मानवविरहित जिप्सी तयार करण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या शास्त्रज्ञांनी करून दाखवला आहे. ध्वनिविरहित इलेक्ट्रिक वाहनाचा यशस्वी प्रयोग पाहता हवाई दलानेही त्या वाहनांची ऑर्डर दिली आहे.लष्कराला अतिशय दुर्गम भागातून प्रवास करावा लागतो. अनेक ठिकाणी वाहतूक करणे कठीण जाते. जिथे माणसालाच मर्यादा पडतात, अशा भागात मानवरहित जिप्सी वापरून संरक्षणाचे काम केले जाणार आहे. ही नव्या रूपातील जिप्सी अतिशय दणकट तयार केली असून, त्यातून इंधनासह लष्कराच्या सामग्रीची वाहतूक केली जाणार आहे. या वाहनास एक किट बसवले आहे. त्यानुसार प्लॅन केलेल्या रूटवरच ते वाहन चालेल. गस्तीदरम्यान त्या वाहनावरील कॅमेरा काम करून जागेवरील संभाव्य धोक्याची सूचना कंट्रोल रूमला देईल.

वन्यजीव सफारीसाठी तयार केली पहिली जिप्सी-
जंगल सफारीसाठी जाणार्‍या पर्यटकांसाठी ध्वनिरहित इलेक्ट्रिक वाहन तयार करण्यात आले आहे. वाहनाच्या आवाजामुळे जंगलात ध्वनि प्रदूषण होते. शिवाय आवाजामुळे प्राणी व पक्ष्यांना त्रास होतो, ही बाब लक्षात घेत संस्थेने वाहनाचे पहिले प्रोटोटाईप मॉडेल राजस्थानातील रणथंभोर व्याघ— प्रकल्पात केले. या ठिकाणी सर्वांत कठीण भूभाग असल्याने या प्रोटोटाईप मॉडेल वाहनाची चाचणी दोन वर्षांपेक्षा जास्त घेण्यात आली. वन विभागाने या इलेक्ट्रॉनिक कन्वर्जन किट वाहनास वापरण्याची परवानगी दिली आहे.

पासिंग आउट परेडसाठीही…
लष्कराच्या तिन्ही दलांसाठी हे इलेक्ट्रॉनिक कन्वर्जन किट उपयुक्त असून, हैदराबाद येथे झालेल्या पासिंग आउट परेडसाठी हे वाहन वापरण्यात आले.

हवाई दलाचीही ऑर्डर…
सीमारेषेवर दुर्गम ठिकाणी रात्री-अपरात्री ड्यूटी बजावताना अनेक सैनिकांना वीरमरण येते. अशावेळी मानवरहित ऑपरेशनसाठी आता ही नवी जिप्सी काम करणार आहे. यासाठी निमलष्करी दलाच्या जवानांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे. हैदराबाद येथील एअरफोर्स अकादमी दुंडीगल येथील परेडसाठी हे वाहन वापरले गेले. हवाई दलाकडून नुकतीच या वाहनाची ऑर्डरही देण्यात आली आहे.

लक्झरी कार, टॅक्सीसह जडवाहनांसाठी असे किट तयार करण्याचे काम सुरू आहे. आम्हाला युरोप, आफि—का, नेपाळ, भूतान या देशांतून रूपांतरण किटसाठी मागणी आली आहे. या संशोधनाला 'अटल इनोव्हेशन मिशन व मायक्रोसॉफ्ट'चाही पुरस्कार मिळाला आहे.

                                 – राजेंद्र जगदाळे, संचालक, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क, पुणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT