पुणे

सिंहगडावर पर्यटकांची गर्दी; खडकवासला, पानशेत, राजगडही फुल्ल

अमृता चौगुले

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: लागोपाठच्या आलेल्या सुट्ट्यांमुळे सिंहगडावर पर्यटकांनी रविवारी (14) उच्चांकी गर्दी केली होती. वाहतूक कोंडी झाल्यामुळे दुपारी सिंहगड घाट रस्ता दीड तास बंद करावी लागला. यामुळे पर्यटकांची गैरसोय झाली. खडकवासला, पानशेत धरण परिसरासह राजगड, मढे घाट परिसरही पर्यटकांनी फुलून गेला होता. खडकवासला धरण चौपाटीवरील पानशेत रस्त्यावर, तसेच डोणजे, अवसरवाडी फाट्यापासून सिंहगडाच्या घाट रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटकांसह स्थानिक नागरिक त्रस्त झाले. वाहतूक कोंडी सुरळीत करण्याऐवजी हवेली पोलिस वाहनांची तपासणी करून पावत्या फाडण्यात व्यस्त होते.

वनविभागाची यंत्रणाही कोलमडून पडली. डोणजे, गोळेवाडी टोल, कोंढणपूर फाट्यापासून गडाच्या गाडीतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वनविभागाचे वनरक्षक बाबासाहेब जिवडे व सुरक्षा रक्षकांनी धावपळ करीत काही प्रमाणात वाहतूक सुरळीत केली. सलग सुट्ट्यांमुळे रविवारी सिंहगडावर गर्दी होणार असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, अशी तक्रार वाहतूक कोंडीत अडकलेल्या पर्यटकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दुपारी चारनंतर पर्यटकांची संख्या कमी झाल्यानंतर वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुरळीत झाली.

पावसाची उघडीप
राजगड, तोरणा, तसेच मढे घाट, पानशेत, वरसगाव धरण परिसर सकाळपासून पर्यटकांनी गजबजून गेला होता. रिमझिम पावसाचा अपवाद वगळता पावसाने उघडीप घेतली. हिरवाईने नटलेल्या डोंगर, दर्‍याखोर्‍यात तसेच भरून वाहणार्‍या धरणावर पर्यटकांनी गर्दी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT