पुणे

सिंहगड रस्त्यावर सहा वर्षे कोंडी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: उड्डाणपुलाच्या कामामुळे सिंहगड रस्त्यावर वाहतून कोंडी होत आहे. या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू होणार असून, ते 2028 पर्यंत चालणार असल्याने तोपर्यंत वाहतूक कोंडी अटळ आहे. 'सिंहगड रस्त्यावरील नियोजित उड्डाणपुलाचे काम 2025 मध्ये पूर्ण होईल,' असा विश्वास महापालिकेचे प्रकल्प अधिकारी श्रीनिवास बोनाला यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रशासनाने जरी तीन वर्षांत काम पूर्ण होईल, असा दावा केला असला तरी या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू होणार आहे. ते संपण्यासाठी किमान 2028 वर्ष उलटणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील सहा वर्षे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला. हा उड्डाणपूल दोन टप्प्यात असून, राजाराम पूल ते फन टाईम हा दोन किलोमीटर लांबीचा पूल असेल तर राजाराम पूल चौक येथे 495 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलासाठी 71 ठिकाणी खोदाई केली जाणार आहे, त्यापैकी 32 ठिकाणी पायाभरणीचे काम झाले आहे. सिंहगड रस्त्यावरील प्रस्तावित मेट्रो मार्ग उभारणीच्या दृष्टीने या पुलाची रचना केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

या उड्डाणपुलासंदर्भात बोनाला यांनी महापालिका आयुक्त आणि इतर अधिकार्‍यांसमोर नुकतेच सादरीकरण केले. या उड्डाणपुलासाठी 118 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात झाली. आतापर्यंत 72 पैकी 36 पिलर उभे राहिले आहेत. एकूण 20 टक्के काम पूर्ण झाले आहे. महामेट्रोने महापालिकेला सादर केलेल्या मेट्रोच्या डीपीआरमध्ये सर्व परवानग्या वेळेत मिळाल्या तर 2024 मध्ये मेट्रोचे काम सुरू होईल व 2028 मध्ये संपेल. जर परवानग्यांना विलंब झाल्यास त्यास आणखी उशीर होऊ शकतो, असे म्हटले आहे.

उड्डाणपुलानंतर मेट्रोचेही काम होणार सुरू

SCROLL FOR NEXT