वर्षा कांबळे: पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सतत सुरू असलेल्या पावसाने वाहनांमध्ये साप सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. चर्होली, दिघी, आळंदी देहू फाटा याठिकाणी नाग, घोणस, तस्कर, गवत्या, धुळनागीण असे साप सापडले आहेत. पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. या गारव्यामुळे साप उबदार ठिकाणाचा शोध घेत चक्क दुचाकी व चारचाकी वाहनात लपून बसत आहेत. त्यामुळे गाडी सुरू करताना खबरदारी घ्यावी असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
ज्या बाईक असतात त्यांच्या पेट्रोलच्या टाकीखाली आणि स्कुटीसारख्या गाड्यामध्ये समोरच्या लाईटच्या ठिकाणी आणि पाठीमागच्या जागी साप लपून बसतात. शेतकरी भाजीपाला ठेवतात तया कॅरेटमध्ये साप देखील आढळतात. आता एक महिन्यापूर्वी दिघीत आंब्याच्या पेटीत घोणस साप व मण्यार आला होता. तो चावल्याने मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी.
-विक्रम भोसले, अध्यक्ष, लाईफ प्रोटेक्शन अॅण्ड कन्झरवेशन ट्रस्ट
शहरात वाहनांमध्ये आढळले साप
पावसाळ्यात बूट घालतानाही घ्यावी काळजी
पावसाळ्यात पायाच्या सुरक्षेसाठी बरेजण बूट घालतात. तर काही कर्मचारी, शालेय विद्यार्थी यांच्या गणवेशाचा तो भाग असतो. बर्याच नागरिकांचे शू रॅक घराच्या बाहेर असते. किंवा बरेचजण दाराबाहेर बूट व चपला काढून ठेवतात. अशावेळी बुटांमध्येदेखील साप लपून बसू शकतो. यासाठी बूट नेहमी तपासून आणि झटकून घालावे असे आवाहन सर्पमित्रांकडून करण्यात येत आहे.
काय काळजी घ्याल
घराच्या परिसरात स्वच्छता राहिली पाहिजे. घराजवळ खरकटे टाकू नये. त्यामुळे उंदीर व घुशींचा प्रादुर्भाव होतो. हे सापाचे अन्न असल्याने त्यांचा माग घेत साप येतात. घरामध्ये स्वच्छतेसाठी फिनेलचा वापर करावा. इतर सुगंधित द्रव्यांचा वापर करू नये. फिनेलमुळे उंदीर, घुशी, झुरळ हे घरात येत नाहीत. तसेच फिनेलचे पाणी वॉशबेसीन आणि बाथरूमच्या ड्रेनेजलाइनमध्ये टाकावे. जेणेकरुन त्याठिकाणीहून साप येणार नाहीत.
घटना 1 : चर्होली याठिकाणी वाहनचालकास गाडी चालवित असताना गिअर टाकल्यावर त्यांच्या पायाला काहीतरी हालचाल जाणवली. गाडी थांबवून पाहिल्यानंतर पेट्रोलच्या टाकीखाली तीन ते चार फुटाची धुळनागीण होती.
घटना 2 : दिघीमध्ये चारचाकी गाडीमध्ये पुढच्या बाजूस तस्कर साप आढळला. गाडी रस्त्याने जाताना समोरून येणार्या दुचाकीस्वाराला गाडीसमोर काहीतरी हालचाल दिसली म्हणून चारचाकी गाडीच्या वाहनचालकास थांबायला सांगितले. पाहिले तर त्याठिकाणी तस्कर साप होता. त्यांनी सर्पमित्रांशी संपर्क केला. गाडीचे बोनेट खोलून सापाला काढले.