पुणे

सावकारीच्या मुळावर नेमका घाव कधी? बारामती शहर, तालुक्यात सर्वसामान्य दहशतीखाली

अमृता चौगुले

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर आणि तालुक्यात सावकारीने अनेक सर्वसामान्य कुटुंबे कमालीची ग्रासली आहेत. गेल्या तीन, चार वर्षांत अनेक बड्या धेंडांना पोलिसांनी गजाआड केले. खासगी सावकारांच्या त्रासाने काहींनी जीवन संपविले. परंतु, तरीही सावकारी संपली नाही. सावकारीच्या मुळावर घाव घातल्याशिवाय या स्थितीतून सर्वसामान्यांची सुटका होणे अशक्य असल्याचे दिसते.
बारामतीत सन 2018 मध्ये सावकारांनी मोठा कहर केला होता. त्या वेळी काहींनी धाडस दाखवत पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या.

त्यानंतर अनेक बड्या सावकारांच्या अंगावर काटा आला होता. अनेक प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल करीत खासगी सावकारी मोडीत काढण्यात काही अंशी यश मिळविले होते. परंतु, त्यानंतर ही कारवाई पुढे थंडावली. त्यामुळे सावकारांनी पुन्हा जोर बांधला. जमीन नावावर करून घेणे, जमिनीचे अथवा इतर मालमत्तेचे साठेखत, खरेदीखत करून घेणे, कोरे धनादेश घेणे, असे प्रकार सावकारांकडून आजही केले जात आहेत. या आठवड्यात तालुक्यात सावकारांविरोधात दोन तक्रारी दाखल झाल्या. तालुका पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत सावकाराने साठेखताऐवजी फसवणुकीने खरेदीखत करून घेतले.

पुढे ही जमीन परस्परच तिसर्‍या व्यक्तीला विकल्यानंतर मूळ मालकाला याची माहिती समजली. आता सावकाराविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर पुढील न्यायालयीन लढाई लढली जाईल. त्यात व्याजाने पैसे घेणारे कुटुंब पुरते आर्थिक अडचणीत असताना न्यायालयीन लढ्यात त्यांना आणखी वेळ व पैसा खर्च करावा लागेल. शहरात गुरुवारी दाखल गुन्ह्यात तर व्यावसायिकाला व्याजाच्या पैशासाठी कुटुंबासमोर मारहाण केली गेली. विशेष म्हणजे, या व्यावसायिकाच्या दुकानातून आरोपींनी वेळोवेळी पाहिजे तितका किराणा माल नेला. शिवाय 40 हजारांच्या बदल्यात 1 लाख 27 हजार घेतले. तरीही व्याजाची हाव सुटली नाही. थेट मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

काही सावकारांनी करून घेतली सोईस्करपणे सुटका
शहरात यापूर्वी अनेकांवर सावकारीचे गुन्हे दाखल झाले. त्यातील काहींनी अत्यंत सोईस्करपणे यातून आपली सुटका करवून घेतली. शहर व तालुक्यात आजही सावकारांचा सर्वांना त्रास सुरूच आहे. अगदी दिवसाला व्याज आकारण्यापर्यंत त्यांचे व्यवहार चालतात. सावकारांवर अंकुश लावण्याच्या मोठ्या राजकीय गर्जना बारामतीत झाल्या. प्रत्यक्षात यातील गुन्हे दाखल झालेली अनेक मंडळी बड्या राजकीय नेत्यांचा सत्कार करताना कार्यक्रमात सर्वसामान्यांना दिसली. त्यामुळे सावकारीवर अंकुश येणार कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

SCROLL FOR NEXT