पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जात आहे. मात्र, अजूनही 600 ते 700 मृतांची कुटुंबीयांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे सानुग्रह अनुदान कधी मिळणार, असा सवाल मृतांचे नातेवाईक करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागांतर्गत आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत राबवण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातून सुमारे 31 हजार अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यातील 25 हजार प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, तर उर्वरित प्रस्ताव दाखल करणार्या मृतांचे नातेवाईक सुनावणीसाठी हजर होत नाहीत. त्यामुळे हे प्रस्ताव निकाली काढता आलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे 24 हजार 700 मृतांच्या नातेवाइकांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली, तर अजूनही सुमारे 600 ते 700 लाभार्थ्यांना प्रस्ताव मंजूर होऊनही बँक खात्यात सानुग्रह अनुदान जमा झालेले नाही.
या संदर्भात अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाकडे अनुदान कधी मिळणार, असा सवाल केला जात आहे. अनुदान वितरणाची प्रक्रिया मंत्रालय स्तरातून सुरू असल्याने अनुदान कधी मिळणार, हे सांगता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, दाखल केलेला अर्ज मंजूर झाला आहे, परंतु अद्याप अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा झालेली नाही, अशा अर्जदारांनी आपल्या बँकेचा तपशील आणि इतर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करायची आहे.
अर्जदारांची सुनावणीकडे पाठ
कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट होत नाही. अपुरी कागदपत्रे असणे, इतर राज्यांतील नागरिकांनी अर्ज करणे, पुणे जिल्ह्यातील परंतु इतर राज्यांत जाऊन मयत होणे आदी कारणाने सुमारे 250 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. सुमारे पाच हजार अर्जदार चौकशीसाठी आलेच नाहीत, त्यात दुबार, ज्याला आवश्यकता नसेल असे अर्जदार होते, यांना संपर्क करण्यात आला परंतु, प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.