पुणे

साकोरीत मध्यरात्री बिबट्याचा धुमाकूळ! पानसरेमळा परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती

अमृता चौगुले

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: साकोरी गावानजीक पानसरेमळा या छोट्याशा वस्तीत शुक्रवारी (दि.5) मध्यरात्री एका घराच्या ओट्यावर बिबट्या ठाण मांडून बसला होता. साकोरी गावाजवळ उत्तरेला पानसरेमळा वस्ती आहे. शुक्रवारी दिवसभर परिसरात विद्युतपुरवठा खंडित असल्याने, काही शेतकरी रात्री शेतीला पाणी देत होते. तर, भानुदास अनाजी पानसरे त्यांच्या घरात झोपलेले होते. मध्यरात्री ते लघुशंकेला झोपेतून उठले असता, त्यांच्या ओट्यावर काही अंतरावर पूर्ण वाढ झालेला बिबट्या बसलेला त्यांना दिसला.

त्यांनी आरडा-ओरडा करीत परिसरातील ग्रामस्थांना मदतीला बोलाविले. ग्रामस्थ आल्यावरही बिबट्या पळून जाण्याऐवजी डरकाळ्या फोडू लागला. काही ग्रामस्थांनी फटाके फोडले, ग्रामस्थांची जशी संख्या वाढली तशा बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या. काही ग्रामस्थांनी वाहनांचे दिवे त्याच्यावर मारले. मात्र, तरीही बिबट्या हलला नाही. तब्बल साडेतीन तासाने बिबट्याने लगतच्या झाडीत धूम ठोकली, असे भानुदास पानसरे यांनी सांगितले. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT