पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार शनिवारी (दि. 9) पुणे शहरात 566, पिंपरी-चिंचवडमध्ये 220, तर पुणे ग्रामीणमध्ये 159 कोरोनाबाधितांची नोंद झाली. जिल्ह्यात एका दिवसात 945 रुग्ण आढळले. शुक्रवारी 1032 रुग्णांची नोंद झाली होती. सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्णही पुणे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 हजार 371 इतकी आहे. पुणे जिल्ह्यानंतर मुंबईत 4 हजार 115 इतके सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढताना दिसत आहे. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासूनच पुणे कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले आहे.
मार्च 2020 मध्ये राज्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्णही पुण्यातच आढळला होता. पहिल्या लाटेत देशातील सर्वाधिक रुग्णांची नोंदही पुण्यात झाली होती. लसीकरण, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग अशा विविध उपायांमुळे कोरोनावर मात करण्यात जिल्ह्याने यश मिळविले. फेब—ुवारी महिन्यात तिसरी लाट ओसरल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत गेली. मात्र, जून महिन्यापासून कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सध्या राज्यात 18 हजार 672 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 34 टक्के सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. सर्वांत कमी सक्रिय रुग्ण गोंदिया जिल्ह्यात असून, तेथील संख्या 6 इतकी आहे.
पुणे शहरात रुग्ण वाढताहेत
महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, शहरात शनिवारी 2 हजार 130 कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैकी 636 रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान झाले. सक्रिय रुग्णांपैकी 20 रुग्ण ऑक्सिजनवर, तर 5 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. दिवसभरात 510 रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 533 अशी आहे.