पुणे

सर्व रेल्वेगाड्यांमध्ये मिळेल बुधवारपासून जनरल तिकीट

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रेल्वेत बंद असलेली जनरल तिकिटाची सेवा येत्या 29 तारखेपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट सेवा बंद केली होती. फक्त आरक्षण असेल, त्याच प्रवाशाला प्रवास करता येत होता. परंतु, यामुळे अचानकच अत्यावश्यक कामासाठी एखाद्या प्रवाशाला प्रवास करावा लागला, तर त्या प्रवाशाचे प्रचंड हाल होत होते. मात्र, कोरोनाचे संकट लक्षात घेऊन प्रशासनाने तब्बल दोन वर्षे रेल्वेतील जनरल तिकीट सेवा बंद ठेवली होती. ती आता बुधवारपासून (दि. 29) सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आरक्षित तिकिटासाठी व्हायची लूट…
प्रवाशांना अचानक रेल्वे प्रवास करावा लागला, तर त्याला वेळेत आरक्षित तिकीट मिळायचे नाही. मग प्रवासी शहरात असलेल्या एजंटांना गाठायचे. हे एजंट रेल्वे प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे घेऊन नागरिकांची लूट करायचे. याबाबत रेल्वेकडून कारवायादेखील करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे होणारी लूट आता जनरल तिकीट सुविधा सुरू झाल्यामुळे थांबणार आहे.

कोरोनाकाळात बंद केलेली जनरल तिकिटाची सेवा येत्या 29 तारखेपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 25 एटीव्हीएम आणि 8 तिकीट काउंटर सुरू राहणार आहेत. गरज भासल्यास आणखी काउंटर सुरू करण्यात येतील.

                          – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

SCROLL FOR NEXT