पुणे

सराइताकडून कामगाराचे अपहरण; चोवीस तासांच्या आत टोळीला ठोकल्या बेड्या

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हॉटेलमधील कामगाराचे अपहरण करून फरारी झालेल्या सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी जेजुरीजवळील दोरगेवाडी डोंगरातून पाठलाग करून पकडले. जेवण केल्यानंतर बिल मागितल्याने त्यांनी कामगाराचे अपहरण करून त्याला मारहाण केली होती. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर सोमवारी रात्री घडली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली. योगेश सर्जेराव पारधे (वय 28, रा. अहमदनगर), रवींद्र सखाहरी कानडे (वय 41), रूपेश अशोक वाडेकर (वय 38), ओंकार जालिंदर बेंद्रे (वय 32), नितीन अशोक वाडेकर (वय 32, रा. रासदर, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत शारदा नीलेश भिलारे (वय 38, रा. भिलारेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारे यांचे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ रानमाळ हॉटेल आहे. आरोपी पारधे, कानडे, वाडेकर, बेंद्रे हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. आरोपींनी जेवण केल्यानंतर हॉटेलमधील कामगार किशोर कोईराला याने त्यांच्याकडे बिल मागितले. त्यानंतर आरोपींनी कोईराला याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी भिलारे यांना धमकावले व आरोपी त्याला घेऊन पसार झाले. त्यानंतर काही अंतरावर त्याला सोडून दिले. हा प्रकार घडल्यानंतर भिलारे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती.

तपास करत असताना, पोलिस कर्मचारी विक्रम सावंत व नीलेश खैरमोडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, अपहरण करणारे आरोपी जेजुरीजवळील दोरगेवाडी येथील डोंगरात लपून बसले आहेत. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, धीरज गुप्ता, कर्मचारी रवींद्र चिप्पा, गणेश गुप्ता, तुळशीराम टेंभुर्णे, सचिन गाडे यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

अटक करण्यात आलेले आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून, बेंद्रे, वाडेकर आणि पारधे यांच्यावर खुनाचा गुन्हाचा गुन्हा दाखल आहे.

                                                                 नितीन शिंदे, पोलिस उपनिरीक्षक

SCROLL FOR NEXT