पुणे

सरदार पटेल रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दोन वर्षांपूर्वी जळून खाक झाले होते, तेव्हापासून शस्त्रक्रिया बंद होत्या. आता सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले. आता शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण दक्षिण कमांडचे महानिरीक्षक केजीएस चव्हाण यांच्यो हस्ते करण्यात आले. कमांड हॉस्पिटलचे उपप्रमुख ब्रिगेडीअर डॉ. भूपेश गोयल, सायबेज आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या नितू नथानी, साबळे-वाघीरे ग्रुपचे सुधीर साबळे, पल्लवी साबळे, अब्बास भाई कादरभाई अब्दुजी ट्रस्टचे चेअरमन फिरोज पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रत पाल, स्वीकृत सदस्य सचिन मथुरावाला उपस्थित होते.

नथानी यांनी सीएसआरअंतर्गत तब्बल एक कोटी 62 लाख रुपये खर्च करून रुग्णालयात मॉडेल शस्त्रक्रियागृह उभारले आहे.
जुने शस्त्रक्रियागृह असताना मोठ्या 500 आणि छोट्या सुमारे एक हजार शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. परंतु आता मॉडेल शस्त्रक्रियागृहामुळे दोन्ही शस्त्रक्रिया दुप्पट होतील. सरदार पटेल रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. महेश दळवी यांनी दिली. रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. उषा तपासे, डॉ. उदय भुजबळ यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.

या शस्त्रक्रिया होणार
डोळे, कान, नाक, घसा, पोटाचे विकार, मूत्रपिंड, मणक्याचे आजार, गर्भाशयाची पिशवी काढणे, स्तन गाठ, हर्निया, अपेंडिक्स, सांध्यांचे फ्रॅक्चर, जॉईंट रिप्लेसमेंट अशा गंभीर आजारांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT