पुणे

सत्र परीक्षेचे नियम जाहीर ; पुणे विद्यापीठाच्या अंतिम सत्र परीक्षेला 20 जूनपासून प्रारंभ

अमृता चौगुले

पुणे :

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लेखी परीक्षा येत्या 20 जूनपासून 100 टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. त्यासाठीची मार्गदर्शक नियमावली परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी जाहीर केली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे. अशा विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, साधारण अडीच वर्षांनंतर पुणे विद्यापीठाची लेखी परीक्षा होत आहे. या परीक्षेला साधारण सात लाख विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षांना येत्या 20 जूनपासून सुरुवात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेखी परीक्षांच्या दरम्यान गोंधळ निर्माण झाला.

या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने खबरदारी घेत, परीक्षेची नियमावली प्रसिद्ध केली आहे. परीक्षांमध्ये एका बाकावर एक विद्यार्थी बसणार असल्याने, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. परीक्षा केंद्रांवर बॅग ठेवण्याची, पाण्याची व्यवस्था करावी लागणार असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तळमजल्यावर परीक्षेला बसण्याची व्यवस्था करावी.

परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी यंदा भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षेत एखादा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळल्यास, त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांना बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी प्रश्नसंच हे विद्यापीठाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पॅटर्ननुसार प्रश्नसंच उपलब्ध आहेत. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली असून, टप्प्याटप्प्याने सर्व परीक्षांचे वेळपत्रक प्रसिद्ध केले जाणार असल्याचेदेखील डॉ. काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

SCROLL FOR NEXT