पुणे

सत्तेचा सारीपाट मांडून पोरखेळ; राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर घणाघाती टीका

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'शेतकर्‍यांचे प्रश्न ऐरणीवर आहेत, त्यांना सध्या आधाराची गरज आहे. अशावेळी राज्यात सत्तेचा सारीपाट मांडून पोरखेळ सुरू आहे. हा प्रकारच लोकशाहीवर प्रेम करणार्‍या लोकांना किळस आणणारा आहे,' अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केली. पुण्यात पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे सांगत शेट्टी यांनी सर्व कारखान्यांच्या चौकशीची मागणी केली. शेतकर्‍यांना जाहीर झालेली मदतही अद्याप शासन निर्णय न झाल्याने मिळालेली नाही, हा निर्णय त्वरित न झाल्यास नऊ ऑगस्टला क्रांतिदिनी आम्ही राज्यात चक्का जाम आंदोलन करू, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

नवीन सरकार स्थापन झाल्यापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप काँग्रेस अन् राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावर शेट्टी म्हणाले, 'मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतानाच एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की, आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करू, परंतु दुर्दैवाने आत्महत्या वाढत चालल्या आहेत. याचे कारण शपथविधी होऊन महिना उलटला, तरी मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही. त्यात शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न आहेत. परंतु त्याकडे लक्ष द्यायला कृषिमंत्री नाही. या परिस्थितीत शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही. प्रशासनावर किती विसंबून राहायचे ? तेच सगळे करणार असतील, तर मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कशाला हवेत?'

एक महिला जी राष्ट्रपती आहे, तिच्याबद्दल विरोधी पक्षातला एक खासदार अर्वाच्य भाषेत बोलतो. ही संस्कृती आपण कुठे घेऊन चाललो आहोत? या देशाची संसदीय परंपरा मोठी आहे. विरोधच करायचा असेल, तर तुमच्याकडे अनेक प्रश्न आहेत, अनेक मुद्दे आहेत. आज जीएसटीमुळे सर्व हैराण झाले आहेत. कराचा बोजा सामान्यांच्या खिशावर पडत आहे. त्यावर बोला, त्यावर आक्रमक व्हा. नसत्या गोष्टीवर आक्रमक होऊन मूळ प्रश्नाला बगल देऊ नका.

                                                                    – राजू शेट्टी, माजी खासदार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT