पुणे : पुढारी वृत्तसेवा: 'गणित शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गणिताविषयी सकारात्मक मनोधारणा निर्माण करावी. 'भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर' अशा गीतातून गणित कठीण असल्याची भीती निर्माण करू नये,' असे मत स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा विज्ञान अध्यापक संघ आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्सच्या वतीने 'राष्ट्राच्या आणि मुलांच्या जडणघडणीतले गणिताचे स्थान' या शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले होत. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी डॉ. विनायक जोशी, नंदकुमार सागर, रोहिदास एकाड, मंदार नामजोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. परिषदेत जयंत खेडकर, डॉ. अश्विनी दातार, डॉ. पराग काळकर यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेला 200 शिक्षक प्रत्यक्ष, तर 2 हजार शिक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. 'प्रत्येकाचा प्रत्यक्ष गणित विषयाशी संबंध येईल, असे नाही. पण, आयुष्यात गणित विचार महत्त्वाचा आहे. राष्ट्राच्या आणि मानवी जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे,' असे मत डॉ. विनायक जोशी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा