इंदापूर : पुढारी वृत्तसेवा: मालोजीराजे भोसले यांच्या इंदापूर नगरीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी 2 जुलै व रविवारी 3 जुलैला दोन दिवस मुक्कामी येत असून या ठिकाणची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा व मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली. पालखी मुक्कामाची तयारी करण्यात आली आहे. शहरातील सर्व कामे पूर्ण झाले आहेत. शहरातील अकलूज नाका येथील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. शहरातील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये पालखीचा मुक्काम असणार आहे.
शहरातील गॅस वितरकांनी गॅसची मागणी करताच तात्काळ गॅस टाकी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. तर निर्मलवारीच्यावतीने शहरांमध्ये एकूण800 शौचालय बसवली असल्याची माहिती निर्मलवारीचे प्रमुख गोरख माने यांनी सांगितले.शहरात विविध ठिकाणी पथदिवे बसविण्यात आले आहेत. इंदापूर शहरातील रिंगण तळाची पाहणी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, इंदापूरच्या तहसीलदार श्रीकांत पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्यासह अधिकारी वर्गाने चार वेळा पाहणी केली आहे. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण केली आहेत. पोलिस प्रशासनाकडुन जवळपास 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी स्वागत कमानी उभारून वैष्णव भक्तांचे स्वागत करण्यासाठी इंदापूरची ऐतिहासिक नगरी सज्ज झाली आहे.