पुणे

पुणे : श्री छत्रपती कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव चोपडे यांचे निधन

रणजित गायकवाड

भवानीनगर (जि. पुणे) : पुढारी वृत्तसेवा

श्री छत्रपती कारखान्याची नाळ जोडलेला नेता म्हणून ओळख असलेले कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतराव धोंडीबा चोपडे (वय ८७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये सुमारे ५० वर्षे विविध पदांवर काम केले आहे.

सन १०७१-७२ च्या कारखान्याच्या निवडणुकीत चोपडे-निंबाळकर पॅनेल निवडून आल्यानंतर कारखान्याच्या अध्यक्षपदी मारुतराव चोपडे यांची निवड झाली. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांच्या विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी छत्रपती इंग्लिश मीडियमची स्थापना केली. कामाची गरज असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना कारखान्यांमध्ये कामाची संधी देण्याचे काम चोपडे यांनी केले होते. कारखान्याच्या नावाला साजेल असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना त्यांच्या संचालक मंडळाच्या काळात झाली. सभासदांच्या मुलांमध्ये कुस्तीची आवड निर्माण व्हावी म्हणून छत्रपती शिवाजी आखाड्याची निर्मिती त्यांनी केली.

श्री छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदानंतर तब्बल २० वर्षे कारखान्यांमध्ये संचालक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. निरा कॅनॉल सोसायटी संघ व सुपर वायझरिंग युनियन या संस्थांवर देखील त्यांनी अध्यक्षपदी काम केले. ढेकळवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदापासून त्यांनी राजकारणाची सुरुवात करून छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदापर्यंत काम केले. छत्रपती कारखाना परिसरात कै. सुमित्राराजे भोसले व कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव सुरु केला होता. त्यांच्या काळात कारखान्याला देशपातळीवरील सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दलचे सुवर्णपदक मिळाले होते.

चोपडे यांचा अंत्यविधी गुरुवारी (दि. २) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास काटेवाडी (ता. बारामती) येथील स्मशानभूमीत पार पडला. यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष अमोल पाटील, अविनाश घोलप, बाळासाहेब घोलप, मदन देवकाते, विठ्ठल पवार, योगेश जगताप, सतीश काकडे, अविनाश गोफणे, दिलीप शिंदे, कामगार नेते युवराज ननवरे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, सभासद आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या मागे मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

SCROLL FOR NEXT